अलिबाग : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा कमालीचा सुखावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 जूननंतर बरसणारा मान्सून आधीच बरसल्याने शेतकर्यांनी शेतीच्या कामाच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एक लाख चार हजार भाताचे क्षेत्र आहे. त्यातील 10 टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते. त्यानुसार 25 हेक्टर क्षेत्रावर भाताच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पावसाने दिलासादायक सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसाने हजेरी लावल्याने त्यांनीही तातडीने भात पेरणीच्या कामांना सुरुवात केल्याने शेतावर शेतकरी आणि शेतमजूर यांची एकच लगबग सुरू असल्याचे दिसून येते. एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतीच्या मशागतीची कामे शेतकर्यांनी आधीच उरकून घेतल्याने पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने औद्योगिकीकरण झाल्याने तसेच नव्याने होत असलेल्या विकासकामांमुळे शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. त्याचप्रमाणे शेती करताना लागणारे बियाणे, शेतीची अवजारे, शेतमजुरांच्या मजुरीचे वाढते दर शेती करणाजया शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाने पाठ फिरवली अथवा मोठे वादळ झाले तर शेतीचे आणि पर्यायाने शेतकर्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होेते. त्यामुळे शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. सध्या पेरणी करण्याच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त आहेत.