पनवेल : खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात रविवारी (दि. 16) सायंकाळी 5.30 वाजता यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांचे मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी प्रा. संजय हिरेमठ व इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या सेमिनारचा लाभ बारावी ते पदवीधर विद्यार्थी घेऊ शकणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9867498161 किंवा 9223555779 या क्रमांकावर संपर्क साधावा.
हळदीसाठी गेलेला तरुण बेपत्ता

पनवेेल ः हळदीच्या कार्यक्रमाला जातो असे सांगून राहत्या घरातून बाहेर पडलेला एक तरुण अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शहराजवळील वडघर येथे राहणारा राजू कुरसन वाळू (23) असे त्याचे नाव असून उंची 5 फूट 2 इंच, रंग काळा सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, कपाळाला नेहमी कुंकू लावतो, केस बारीक, मिशी काळी-बारीक, दोन्ही हातावर त्याचे नाव इंग्रजीमध्ये गोंदलेले, तसेच हाताच्या अंगठ्यावर मराठीमध्ये आई असे लिहिलेले आहे. अंगावर फूल बाह्याचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणेे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस हवालदार एस. एम. फाळके यांच्याशी संपर्क साधावा.
कंटेनरने चिरडल्यामुळे एकाचा मृत्यू
पनवेेल ः कळंबोली एका गोडावूनजवळ कंटेनर पार्क करण्यासाठी मागे घेत असताना कंटेनरच्या पाठीमागील चाकाखाली चिरडून एका गृहस्थाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनरखाली चिरडल्याने मृत पावलेल्या गृहस्थाचे नाव मोहम्मद ताजुद्दीन शेख (30) असे असून त्याच्या पॅन्टच्या खिशात असलेल्या आधारकार्डवरून त्याची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर कंटेनर चालकाविरुद्ध कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गळफास घेऊन आत्महत्या
पनवेेल ः क्षुल्लक कारणावरून एका विवाहितेने राहत्या घरातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोन गावाच्या हद्दीत घडली आहे. कोन गावात राहणार्या दर्शना दत्तात्रेय पाटील यांनी घरातील क्षुल्लक वादातून रागाच्या भरात बाथरूमध्ये जाऊन ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.