शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर
अलिबाग : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी (दि. 14)जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील विविध भागातून 250 शिक्षक दाखल झाले होते. मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या तालुक्यातील बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. त्यामुळे बदली प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषदेत दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. शिक्षकामध्ये एकूणच समुपदेशन प्रक्रियेबाबत नाराजीचा सूर होता.
जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यासाठी शुक्रवारी शिवतिर्थावर समुपदेशन प्रक्रिया झाली. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या शिक्षकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, अलिबाग या तालुक्यांमधील बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांचा चांगलाच भ्रमनिरास झाला. त्यातच समतोल राखण्यासाठी या तालुक्यामधील काही जागा ब्लॉक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अजूनच गोंधळ उडाला. शिक्षकांकडून या तालुक्यांमधली किती पद रिक्त होती, ती कशी भरली गेली, याची विचारणा केली जात होती. मात्र प्रशासनाकडून कुठलीच माहिती दिली जात नसल्याने संपुर्ण समुपदेशन प्रक्रियेबाबत नाराजी होती.
सुरुवातीला महिला शिक्षकांना पाच जणींच्या समुहाने बोलविले जात होते. पनवेल, उरण, कर्जत, खालापुर, अलिबाग तालुके वगळून अन्य तालुक्यामधील रिक्त जागांची माहिती देऊन शाळा निवडण्याची सक्ती केली जात होती. त्यामुळे गोंधळलेल्या वातावरणात हताश होऊन शिक्षक बाहेर पडत होते. समुपदेशन प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा सूर शिक्षकांनी लावला होता. त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता. शेवटी व्हिडीओ चित्रिकरणात ही प्रक्रिया पुर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.