Breaking News

महाडमध्ये नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा

दासगाव : रामप्रहर वृत्त

महाड तालुक्यातील हजारो दरडग्रस्त कुटुंबांना महाडच्या महसूल विभागाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. संभाव्य दरडीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ही कार्यवाही केली आहे.

नोटीस बजावून सुविधा न देणे म्हणजे दरडग्रस्तांना वार्‍यावर सोडण्याचा प्रकार आहे. आपत्ती व्यवस्थापन, दरडीपासून सुरक्षा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमावर लाखोची उधळण करणार्‍या शासनामार्फत 2005 पासून या नोटिसा बजावल्या जात आहेत.

महाड तालुक्यात 2005 मध्ये रोहन, जुई, कोंडीवते आणि दासगावमध्ये दरडी कोसळून वित्त, तसेच जीवितहानी झाली होती. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्याकडून केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे महाड तालुक्यात सध्या 48 गावांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. या गावांमध्ये जवळपास 1200 कुटुंबांचा जीव धोक्यात आहे. महाड तालुक्यातील दासगाव, तुडील, चांढवे, कोंडीवते, मुमुर्शी, कुंबळे अशा अनेक मोठ्या गावांचा समावेश आहे. सर्वेक्षणानंतर शासनाने 48 गावांतील हजारो कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. 2005 पासून प्रत्येक वर्षी सर्वेक्षण करत दरडग्रस्त गावातील ग्रामस्थांना नोटिसा देऊन शासन हात झटकण्याचे काम करत आहे.

-आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण

महाडमधील 48 गावांत पावसाळ्यात दरडग्रस्त गावांतील कुटुंबांनी आपत्तीला तोंड कशा प्रकारे द्यायचे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून या गावांना जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समाधान कडू -18 गावे, हर्षद सोनावणे -12 गावे आणि अनिकेत पाटील 18 गावांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शासनाकडून दरड संभाव्य ठिकाणी मार्गदर्शन फलक लावून नागरिकांना जनजागृती करण्यात आली आहे.

– दरडग्रस्त नागरिकांना आपत्ती काळात घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच गावांमध्ये जनजागृतीपर मार्गदर्शनही करण्यात आले आहे.

-प्रदीप कुडळ,

नायब तहसीलदार, महाड

-गेली 14 वर्षे शासन दासगावमधील दरडग्रस्तांना पूर्ण पैसे देऊ शकली नाही. ते नोटिसा बजावण्याच्या पलीकडे काय करणार? एकीकडे नोटिसा बजावल्या जातात, तर दुसरीकडे प्रशासन दरडग्रस्तांना केवळ आश्वासन देत आहे.

-दिलीप उकिर्डे, सरपंच

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply