रोहा व माणगाव तालुका संपूर्ण डोंगराळ आणि दुर्गम आहे. सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये वसवलेल्या या तालुक्यात प्रामुख्याने कुणबी जातीचे लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत असत. सुमारे 300 ते 400 सें.मी. एवढे वार्षिक पर्जन्यमान असताना केवळ भाताचे एकच पीक घेतले जात होते. साहजिकच फक्त भातपिकावर येथील शेतकरी कुटुंबाची गुजराण करताना त्यांना आर्थिक काटकसर करावी लागत होती. परिणामी आर्थिक ओढाताण झाली की माणगावपासून जवळ असलेल्या मुंबईकडे लोक कामानिमित्ताने जात असत. ते काम मिळविल्यानंतर त्यांच्या मिळकतीमधील काही रक्कम मनीऑर्डरने आपल्या गावाकडे पाठवत असत. अशा प्रकारे लोकांचा चरितार्थ चालत असे.
पावसाळा संपल्यानंतर जेमतेम महिनाभर पाण्याचे स्त्रोत चालतात. नंतर लोकांसाठी जनावरांसाठी वणवण सुरू होत असे. पुढील पावसाळा येईपर्यंत आता हे चक्र थांबले आहे. काळ प्रकल्पामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ विक्षेपण बंधारा बांधून भिरा येथील टाटा जलविद्युत केंद्रातून बाहेर पडणार्या अवजलावर काळ प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सन 1976पासून प्रत्यक्ष सिंचनास सुरुवात झाली. पिण्यासाठी व सिंचनासाठी प्रामुख्याने या पाण्याचा वापर केला जातो. काही औद्योगिक वसाहतीलाही या पाण्याचा पुरवठा केला जातो. माणगाव रोहा तालुक्यातील सुमारे 7930.00 हेक्टर जमिनीला प्रत्यक्ष सिंचन केले जाते. शिवाय 150 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटला आहे. काळ प्रकल्पांतर्गत कालव्याच्या लांबीचे क्षेत्र कुंडलिका उजवा तीर कालवा 288 किमी, कुंडलिका दावा तीर कालवा 10 किमी, रोहा शाखा 21 किमी, मोर्बा शाखा 33 किमी, माणगाव शाखा 32 किमी, गोरेगाव शाखा 12 किमी, अंबा कालवा अशा प्रकारे वेगवेगळ्या कालव्यांतून त्यांच्या वितरिकांमार्फत अगदी शेत ते शेत पाणी पुरवठ्याचे सिंचित केले जात आहे. माणगाव तालुक्यातील 76 व रोहा तालुक्यातील 48 गावांना उन्हाळी हंगामासाठी सिंचनासाठी पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांची शेती दुबार झाली आहे. शेतकर्यांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शेतकरी भात पिकाबरोबर भाजीपाला व व्यापारी पिकेसुध्दा घेत आहेत.
सामाजिक व आर्थिक परिस्थिती
तालुक्यामध्ये सामान्यपणे कुणबी, कोळी, आदिवासी, कातकरी तसेच अनेक मागासवर्गातील लोक अगदी गरिबीचे जीवन जगत आहेत. भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी भाताचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भातपीक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही. त्यामुळे शेती करणार्या शेतकरी लोकांनी आता इतर पिकांकडे वळण्याची गरज आहे. जेणेकरून शेती त्यांना किफायतशीर ठरावी. त्यांना ती वाढवावी अशा पिकाची निवड करणे क्रमप्राप्त आहे. पूर्वी कालव्याचे पाणी नसल्यामुळे उन्हाळी शेती त्यांना करता येत नसे, परंतु आता संपूर्णपणे चित्र बदलले आहे. दुबार पिके घेण्याची संधी शेतकर्यांना मिळू लागली आहे. त्यामुळे शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यासाठी फक्त गरज आहे ती शेतकर्यांच्या इच्छाशक्तीची आणि ही इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी सामाजिक जागृती करणे गरजेचे आहे. पीक व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, संकरित जास्त उत्पादन देणार्या पिकांच्या जाती याची निवड शेतकर्यांनी करायची आहे. योग्य पाणी, खत पिकाची जात या बाबी जर शेतकर्यांनी लक्षात घेतल्या तर त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. कधी कठीण परिस्थितीशी झगडणारा शेतकरी आता लाखो लोकांचा पोशिंदा झाला आहे. शेतकर्यांबरोबर समाजातील इतर घटकांचासुध्दा विकास झाला आहे. हे सिंचन शेतीमुळेच शक्य झाले आहे.
बदल-परिवर्तन
रस्ते, वीज आणि पाणी हे विकासाचे प्रमुख घटक आहेत. हे तीनही घटक ज्या भागात सहजतेने उपलब्ध होतात त्या भागाचा विकास धावायला लागतो. आपल्या भागाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय महामार्ग नं. 17 मुंबई-गोवा हायवे आपल्या तालुक्यातून तसेच माणगाव-पुणे माणगाव-श्रीवर्धन हे राज्य मार्गदेखील आहेत. दळणवळणामुळे मोठ्या प्रमाणात सोयी निर्माण केल्या आहेत. मुंबई व पुणे ही महाराष्ट्रातील प्रमुख महानगरे माणगावपासून हाकेच्या अंतरावर आहेत. शिवाय जोडीला रेल्वेही आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकरी केवळ भातपिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या प्रकारची व्यापारी पिके घेऊ लागले आहेत. जसे कलिंगड, भेंडी, मुळा, माठ, शेपू, शिराळी, काकडी, रताळी, कडधान्य, शेकट, वांगी अशा प्रकारची पिके शेतकरी आपल्या शेतात लागवड करू लागले आहेत. जो भाजीपाला पूर्वी मुंबई-पुणे, वाई, सातारा या भागातून आणला जात होता. आजची परिस्थिती पूर्णपणे नाही परंतु मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आज माणगाव तालुक्यातून अनेक ट्रक, टेम्पो, रेल्वेने मुंबईत वांगी, भेंडी, कारली, शिराळी पाठवली जातात. मुंबई-पुण्यात भाजीपाल्याने रोहा माणगावची ओळख निर्माण केली आहे. पूर्वी रायगडमध्ये अलिबागची कलिंगड प्रसिध्द होती. त्याला आता रोहा-माणगावने पाठीमागे सारले आहे. कारण माणगावची कलिंगडे ही पुणे, मुंबई या मार्केटपर्यंत मर्यादित नाही, तर फलटण, बारामती, नाशिक, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, सातारा या मार्केटमध्येही पोहचली आहेत. शेतकर्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माणगावच्या दर्याखोर्यात शेती करणारा शेतकरी पूर्वी मुंबईवरून येणार्या मनीऑर्डरची वाट पहात बसायचा. आता परिस्थिीती बदलली आहे. गावातील लोकांना गावातच रोजगार मिळतो. शेतकरी स्वावलंबी बनला आहे. हा विकास सिंचनामुळे साध्य झाला. काळ प्रकल्पाच्या कालव्याने हे साध्य झाले आहे. काळ प्रकल्प होण्यापूर्वी अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. ती आता पूर्णपणे मिटली. मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत आहे. अनेक गावांना उचलून पाणीपुरवठा केला जातो. अलिबाग, नागोठणे, रोहा, माणगाव या ठिकाणी असणार्या एमआयडीसींनाही काळ प्रकल्पामधून पाणीपुरवठा केला जातो. खरोखरंच काळ प्रकल्पामुळे माणगाव, रोहा तालुक्यात हरितक्रांती झाली आहे. मुंबईवरून प्रवास करत कोकणात जाणार्या प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हाच्या प्रचंड झळा लागतात. तो प्रवासी ज्यावेळी माणगाव तालुक्यातील महामार्गावरून जातो त्यावेळी उन्हाळ्यातसुध्दा हवेत गारवा असतो. तो गारवा निश्चितच आल्हाददायक असतो. अनेक प्रवासी वृक्षाच्या छायेखाली निवांतपणे विश्रांती घेतात.
पाण्याची परिस्थिती
ज्यावेळी धरण, कालवे निर्माण केले त्यावेळची स्थिती व आजची स्थिती यात बराच फरक आहे. कालवा निर्मितीनंतर जेवढे क्षेत्र सिंचनाखाली यायला हवे होते तेवढे आले नाही. शिवाय कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यामुळे कालव्याला येऊन मिळणारे नाले, ओढे यामुळे कालव्यात फार मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. शिवाय कालव्याचे पाणी सुरू असताना कालव्यात शेवाळ फार मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे कालव्यातील पाणी वहनाचा वेग कमी होतो. गावविस्तारामुळे, नागरीकरणामुळे कालव्यावर ताण पडत आहे. नागरिकांना सर्वच ठिकाणी घाट बांधून देणे शक्य नाही. अशा परिस्थितीत कालव्याची माती बर्याच वर्षापासून तीच आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे खेकडे, चिंबोरी हे कालव्यात बिळे पाडतात. त्यामुळे पाणी वाया जाते. साहजिकच सिंचनाच्या शेतीवर वरील सर्व घटकांचा परिणाम घडतो. काही प्रसंगी शेतकर्यांना अपुर्या पाण्याचा पुरवठा होतो. त्याचा परिणाम पिकावर व उत्पादनावर होतो. यासाठी महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून सदर प्रकल्पाचे संपूर्णपणे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण 7930 हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार आहे.
धनधान्याची मुबलकता
काळ प्रकल्प माणगाव, रोहा तालुक्यात आला व खर्या अर्थाने दोन्ही तालुक्यांत विकासगंगा आली. रस्ते, वीज, पाणी हे घटक मुबलक प्रमाणात असल्यामुळे तालुक्यात विकासाचा झेंडा डोलाने फडकत आहे. प्रकल्प येण्यापूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष, अन्नधान्याची कमतरता होती. प्रकल्पामुळे कालवा सिंचित क्षेत्रात दुबार पिके घेतली जातात. भात, कारली, भेंडी, शिराळी, कलिंगड ही पिके घेतली जातात. त्यामुळे शेतकर्यांकडे मुबलक पैसा येतो. दोन महानगरे जवळ असल्यामुळे भाजीपाल्याला चांगला दर मिळतो. अन्नधान्यात संकरित बियाणांच्या वापरामुळे कमी कष्टात जास्त उत्पादन मिळते. आपली गरज भागवून उरलेले अन्नधान्य बाजारात शेतकरी विक्री करीत आहेत. फळबागा, आंबा, काजू, फणस, नारळ, जांभूळ ही फळे मोठ्या प्रमाणात घेतली जात असून त्यातूनही शेतकर्यांना चांगल्या प्रकारे अर्थार्जन होते. शिवाय गावातील लोकांना गावातच रोजगार मिळत आहे.
-सलिम शेख