आनंदाने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव
अलिबाग : जिमाका : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अंमलबजावणी करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी दिनांक 17 जून ते 2 जुलै 2019 या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव आनंदाने साजरा झाला. यावेळी प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्राम पंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. प्रवेश पात्र बालकांची यादी ध्वनीक्षेपकावर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचत गट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले होते. शाळेचा परिसर गावकर्यांच्या सहाय्याने स्वच्छ करून सडा रांगोळी व पाना फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने प्रवेशित होणार्या विद्यार्थ्यांचे स्वागत झाले तसेच खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्यक्ष वर्गाध्यापनास प्रारंभ करण्यात आला. शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. जिल्हास्तरीय संपर्क अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शाळांना भेटी देऊन विधायक सूचना दिल्या. शाळेच्या प्रथम दिनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी मानीभुते (ता. अलिबाग) येथील शाळेला भेट दिली.
कही खुशी कही गम
अलिबाग : प्रतिनिधी : दोन महिन्याची सुट्टी घेतल्यानंतर बच्चेकंपनी सोमवार (दि. 17) पासून शाळेत आली. त्यामुळे शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरु झाला. काही विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत आल्याचा आनंद घेत होते. पहिल्या दिवशी पालकांसोबत शाळेत जाताना रडणारे विद्यर्थीदेखील पहायला मिळत होते. त्यामुळे कही खुशी कही गम असे वातावरण होते. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार नव्याने शाळेत येणार्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये आनंदी वातावरण निर्माण व्हावे या दृष्टीकोनातून सोमवारी प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके देण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे तसेच इतर अधिकार्यांनी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. खाजगी शाळादेखील सोमवारपासून सुरु झाल्या. शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे आपले मित्र, मैत्रिणी पुन्हा भेटणार म्हणून विद्यार्थी आनंदात होते. पहिल्याच दिवशी शाळेत जाताना रडणारे विद्यार्थी देखील पाहायला मिळत होते.
नांदगाव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप
मुरूड : प्रतिनिधी : तालुक्यातील यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयात सोमवारी पाचवी ते आठवीपर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संचालक अरविंद भंडारी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रेय खुळपे, सहशिक्षक गणेश ठोसर, प्रतीक पेडणेकर, महेश वाडकर, योगेश पाटील, सागर राऊत, नरेश भेर्ले आदी उपस्थित होते. सर्व शिक्षा अभियानातंर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांनी पुस्तकांची व्यवस्थित काळजी घेऊन यातून ज्ञान प्राप्त करावे, असे आवाहन ग्रंथपाल संजय करडे यांनी प्रास्ताविकात केले. फैरोज घलटे यांनी नवीन पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर राऊत यांनी केले.
शाळेचा पहिला दिवस स्वागतोत्सवाने साजरा
म्हसळा : प्रतिनिधी : दीड महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवार (दि. 17) पासून शाळा सुरू झाल्या. नवीन वह्या, पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाला. शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. यंदाही म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कुलचे प्राचार्य माळी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे, प्राचार्य बाळासाहेब माळी, पर्यवेक्षक महामुलकर, मंगेश कदम, दीपक सूर्यवंशी, सचिन गायकवाड यांच्यासह पालक उपस्थित होते. यावेळी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. प्राचार्य माळी यानी नवीन विद्यार्थ्यांचे बरोबरीने शाळेतील अन्य विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
सुधागडात नवागतांचे वाजतगाजत स्वागत
पाली : प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारी (दि.17) सुरु झाल्या.शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, उत्साह आणि आनंद संचारला होता. सुधागड तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकांसह विद्यार्थी, शिक्षकांनी सकाळी प्रभात फेरी आणि दिंडी काढली होती.समग्र शिक्षा अनुदान अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. तालुक्यातील काही शाळांमध्ये फुलांची व फुग्याची सजावट करण्यात आली होती, रांगोळ्या काढल्या होत्या. तोरणे बांधली होती. सुधागड तालुक्यातील नेणवली प्राथमिक शाळेमध्ये 100टक्के मुले दाखल झाली होती. त्यांना वृक्ष भेट व पुस्तक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलीस पाटील समिती सदस्य ,ग्रामस्थ,शाळा मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
रोह्यात तहसीलदार, गटविकास अधिकार्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
रोहे ः प्रतिनिधी : उन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सोमवार (दि.17 जून) पासून सुरू झाल्या असून, रोहे तालुक्यात पहिल्याच दिवशी शासकीय अधिकारी व शिक्षकांनी चॉकलेट, फुगे, गुलाबपुष्प व पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यामुळे विद्यार्थी आनंदात होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी रोहा तालुक्यात पहिली ते सातवी पर्यंत 237 शाळांमधून 1105 विद्यार्थी दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचे तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी पंडित राठोड, गट शिक्षण अधिकारी सादुराम बांगारे, डॉ. अभय ससाणे, प्रशासन अधिकारी संजय कवितके, कक्ष अधिकारी सुनील बोरसे, पंचायत समिती कृषी अधिकारी अशोक महामुनी, मिलींंद देवकर यांनी तर नगर परिषदेच्या शाळेत प्रशासन अधिकारी बी. के. पाखरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल वाटवे, मनोज वाणी, पूजा भोईर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, केंद्र प्रमुख, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. रोहा तालुक्यात 237 शाळा सुरू झाल्या. यामध्ये आज 498शिक्षक शाळेत उपस्थित होते. रोहा तालुक्यात एकूण 540 मुले व 565 मुली असे एकूण 1105 विद्यार्थी पहिल्याच दिवशी शाळेत दाखल झाले आहेत.