ठाणे : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील युवकांना शरीरसौष्ठवाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी 15व्या महाराष्ट्र श्री स्पर्धेचे आयोजन 5 आणि 6 मार्चला टिटवाळा येथे करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र श्री’चा थरार आजवर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे या शहरी भागांत अधिक पाहायला मिळाला, पण शरीरसौष्ठवाची आणि फिटनेसची क्रेझ आता दिवसेंदिवस ग्रामीण भागातही झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे महागणपतीच्या साक्षीने विजेता ठरणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक संतोष तरे यांनी महाराष्ट्र श्री स्पर्धा आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. तब्बल दोनशे खेळाडूंच्या निवासासह दोन दिवस त्यांना त्यांचा आवडता खुराकही दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमी सर्वोच्च असलेल्या या स्पर्धेचा थाट यंदाही तसाच असेल. स्पर्धा राज्य अजिंक्यपद असली तरी या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी लीलया पार पाडणार्या महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा होणार आहे.
‘महाराष्ट्र श्री’चा अंतिम सामना 6 मार्चला रंगणार असून, विजेत्याला गतवर्षीप्रमाणे दीड लाखाचा रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर उपविजेत्याला 75 हजारांचे रोख इनाम दिला जाईल. 10 गटांत ही स्पर्धा रंगणार आहे. सहा खेळाडूंना 15, 12, 8, 6, 5 आणि 3 हजार असे रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरुष-महिलांचे फिजीक स्पोर्ट्स आणि महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा अशा अन्य तीन गटांसह एकून 13 गटांमध्ये ही स्पर्धा होईल. या स्पर्धेतूनच 29 ते 31 मार्चदरम्यान चेन्नई येथे होणार्या भारत श्री स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.
महिलांसाठी फिजीक स्पोर्ट्स आणि शरीरसौष्ठव असे दोन्ही गट या स्पर्धेत खेळविले जाणार आहेत. मिस मुंबई स्पर्धेतच सात खेळाडूंच्या सहभागामुळे मिस महाराष्ट्रसाठी महिलांचा आकडा वाढणार हे निश्चित होते. त्यानुसार या स्पर्धेत तब्बल 20पेक्षा अधिक महिला अॅथलिट खेळणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस अॅड. विक्रम रोठे यांनी दिली.
मुंबईचा संघ सगळ्यात बलाढ्य असला तरी स्पर्धेचे यजमानपद भूषविणार्या ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेकडे सागर माळी, दिनेश कांबळे, अजय नायर, गणेश आंबुर्ले, संतोष शुक्ला असे तगडे खेळाडू असल्यामुळे चार वजनी गटात गटविजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. एवढेच नव्हे तर पाच वेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान पटकावणार्या सुनीत जाधवलाही सागर माळीविरूद्ध आपला जोर दाखवावा लागणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सलग पाच वेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान पटकावणार्या सुनीत जाधवला जेतेपदाचा षटकार ठोकणे फार आव्हानात्मक असेल. नवी मुंबईत झालेल्या स्पर्धेत 85 किलो वजनी गटात सुनीतसह सागर माळी आणि महेंद्र चव्हाणसारखे तगडे खेळाडू उतरले होते. हा गटच अंतिम सामन्यासारखा होता. विशेष म्हणजे गटविजेता निवडताना सुनीतऐवजी सागर आणि महेंद्रची कंपेरिझन घेण्यात आली. अखेर सागरने गटविजेतेपद जिंकत आपले जेतेपदही निश्चित केले. त्यामुळे या स्पर्धेसाठी महेंद्र पगडे आणि अनिल बिलावा हे जबरदस्त तयारीतले खेळाडूही उतरत असल्यामुळे सुनीत जेतेपदाचा सिक्सर मारतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे.