टाँटन : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजला बांगलादेश विरुद्ध 300 पेक्षा अधिक धावा करून विजयी होता आले नाही. या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने प्रतिक्रिया दिली. होल्डर म्हणाला, ‘या पराभवानंतर वेस्ट इंडिज टीमची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची वाट खडतर झाली आहे, पण अशक्य नाही. आम्ही यापुढील प्रत्येक मॅच ही फायनल मॅचप्रमाणे खेळणार आहोत. आम्हाला प्रत्येक मॅच जिंकावी लागेल, त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची आशा कायम राहील,’ असा आशावाद होल्डरने व्यक्त केला.
बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सोमवारी (दि 17) झालेल्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा पराभव केला. वेस्ट इंडिजने बांगलादेशला विजयासाठी 322 रनचे आव्हान दिले होते. बांगलादेशने हे विजयी आव्हान 3 विकेट गमावून 8 ओव्हर आधीच पूर्ण केले. वेस्ट इंडडिजच्या पुढील 2 मॅच न्यूझीलंड आणि इंडिया यांच्या विरुद्ध होणार आहे. या दोन्ही टीम यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पराभूत झालेल्या नाहीत. ‘आम्हाला सेमीफायनलमध्ये धडक मारायची असेल, तर सर्वश्रेष्ठ टीमचा पराभव करावा लागेल,’ असे होल्डर म्हणाला.