पनवेल : रामप्रहर वृत्त
बँकिंग सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. बँकेचे ग्राहक व डीएसए प्रदीपराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व उपस्थितांनी दोन्ही महामानवास पुष्प अर्पण करून मानाचा मुजरा केला. या कार्यक्रमाला बँकेचे शाखा प्रबंधक विजय पाटील, प्रबंधक शैलजा ठाकेकर, विशेष सहायक अरविंद मोरे व दफ्तरी वामनराव गायकवाड उपस्थित होते. या वेळी अरविंद मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण केले की, प्रत्येकाच्या अंगात उत्साह व नवचैतन्य संचारते. हे केवळ छत्रपतींच्या अंगी असलेल्या अष्टपैलू गुणामुळे व कर्तृत्वामुळेच. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. तसेच ते सर्वांचे उद्धारकर्तेसुद्धा होते. ते महिलांचा सन्मान करणारे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे पर्यावरण रक्षक होते. ते या मताचे होते की, किल्ल्यांच्या रक्षणासाठी जसे सैनिक, मावळे गरजेचे आहेत तेवढेच वृक्षसुद्धा किल्ल्याच्या व पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकर्यांचीही विशेष काळजी घेणारे होते. अशा या अष्टपैलू व्यतिमत्व असलेल्या छत्रपतींना स्मरण करून त्यांच्या गुणांचे अनुकरण करणे फार गरचेचे असून ते सर्वांनी अवलंबिणे ही काळाची गरज आहे. बँकेचे सन्माननीय ग्राहक रणजित चव्हाण, स्वराज पाटील, दत्तात्रय ननावरे, अरबाज, यशवंते, गुरुनाथ ननावरे व इतर ग्राहक उपस्थित होते.
कळंबोलीत उभारलेला बारा फुटी जिरेटोप पाहण्यासाठी गर्दी
पनवेल : वार्ताहर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कळंबोली वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या बारा फुटी जिरेटोप पाहण्यासाठी कळंबोली वासियांसह शिवप्रेमींनी गर्दी केली असून मोठ्या प्रमाणात या जिरेटोपाबरोबर सेल्फी काढण्याचा तरुण वर्ग आनंद घेत आहेत. येथील घाटी मराठी संघटनेतर्फे बनविण्यात आलेला बारा फूट उंचीचा जिरेटोप आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कळंबोलीतील घाटी मराठी संघटनेतर्फे बनवण्यात आलेल्या 12 फूट उंच, सात मीटर रुंद जिरेटोपाकरिता सात किलो वजनाचे 140 मीटर कापड वापरण्यात आले असून, 75 किलो कापूस व 50 किलो लोखंड वापरून बनवण्यात आलेल्या हा जिरेटोप बनविण्यासाठी रामरेखा जेस्वाल या कारागिराने मोफत काम केले. या जिरेटोपाचे एकूण वजन 132 किलो एवढे आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने अनावरण करण्यात आलेला हा जिरेटोप रायगड किल्ल्यावर शिवप्रेमींना दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी दिली आहे.