परिवर्तन आघाडीकडून तीव्र निषेध; ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला
अलिबाग : प्रतिनिधी
शहराला लागून असलेल्या चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच चेंढरे येथे शिवसेना, भाजप प्रणित परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचे प्रचाराचे बॅनर फाडण्यात आले आहेत. आघाडीकडून त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीची निवडणूक शेकाप तसेच शिवसेना-भाजप प्रणित आघाडीने प्रतिष्ठेची बनविली आहे. चेंढरे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 6 मध्ये परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचे लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिवर्तन आघाडीचे अॅड. महेश मोहिते, विजय कवळे, अॅड. जनार्दन पाटील, महेंद्र दळवी, अॅड. परेश देशमुख, अॅड. सुशील पाटील आदी या पत्रकार परिषदेच्यावेळी उपस्थित होते. परिवर्तन आघाडीचे बॅनर हे शेकापच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याचा आरोप आघाडीने केला असून, शेकापने ही कृत्ये थांबवली नाही, तर आघाडी त्यांच्याविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल, असा इशारा अॅड. महेश मोहिते यांनी या वेळी दिला. पायाखालची जमीन सरकल्यामुळे अशी कृत्ये विरोधकांकडून घडत आहेत, असेही ते म्हणाले. वरसोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरसोली ग्रामपंचायतीच्या मतदारांना घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचे आश्वासन विरोधकांकडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे घरपट्टी आणि पाणीपट्टी ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. तीच साधने बंद झाली तर ग्रामपंचायत कशी चालणार? असा सवाल विजय कवळे यांनी यावेळी उपस्थित केला. तर अशी चुकीची आश्वासने देणार्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा, असे महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे.
चेंढरे आणि वरसोली या दोन्ही ग्रामपंचायती अलिबाग शहराला लागून असल्याने शेकाप आणि शिवसेना-भाजपने त्या प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.