कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे नुकसान करणार नाही, असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे दिल्याने कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थी आणि पालकांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी (दि, 2) रात्री दहा वाजता स्थगित करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे वाढीव गुण मुंबई बोर्डाला वेळेत न कळविणार्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, असे जिल्हा शिक्षण अधिकार्यांनी सूचित केले आहे.
कर्जत शहरातील इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मार्च 2019 मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या 56 विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि वादन या विषयातील वाढीव गुण शाळेच्या वतीने शालांत परीक्षेच्या मुंबई बोर्डाला वेळेत कळविले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी 2मेपासून शहरातील लोकमान्य टिळक चौकात उपोषण सुरू केले होते. त्यामुळे सर्वत्र जोरदार हालचाली सुरु झाल्या. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी तात्काळ मुंबई शालांत परीक्षा मंडळाच्या विभागीय सचिवांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी त्या सर्व 56 विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि वादन या विषयातील वाढीव गुण कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुलचे व्यवस्थापन मंडळ आणि मुख्यध्यापक यांच्याकडून विलंब शुल्क आकारून गुण समाविष्ट करावेत, अशी सूचित केले. त्याचवेळी विद्यार्थ्यांचे गुण वेळेत न कळविण्याची चूक करणार्या मुख्याध्यापक विनोद अडसुंदेकर यांच्यावर कारवाई करण्याची सूचना संस्थेला लेखी पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, स्थानिक आमदार सुरेश लाड, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, सुनील गोगटे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, पालक पंकज ओसवाल यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी, सचिव प्रवीण गांगल हेदेखील उपस्थित होते. कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रकरण समजून घेतल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान शिक्षण विभाग करणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र वाढीव गुण बाबत शाळेच्या वतीने 56 विद्यार्थ्यांची उशिरा देण्यात आलेली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातील आणि मुंबई शालांत परीक्षा मंडळ त्यावर निर्णय घेईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
त्यानंतर रात्री दहा वाजता मंत्रालयात गेलेले सर्व प्रमुख कर्जत येथे पोहचले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी शाळेच्या वतीने पालकांकडून करण्यात आलेल्या सूचनांबाबत 5मे रोजी पालक व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व विद्यार्थी, पालकांनी उपोषण स्थगित केले. दरम्यान, शाळेतील भौतिक सुविधा, मुलींच्या शारीरिक समस्याबाबत शाळेची उदासीन भूमिका, दरवर्षी वाढविण्यात येणारी फी वाढ, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारा त्रास, शिक्षकांची मुले आणि अन्य विद्यार्थी यांच्यात केला जाणारा भेदभाव, तक्रारी करणार्या पालकांवर नजर ठेवून त्यांच्या मुलांना दिला जाणारा मानसिक त्रास, पालक शिक्षक संघ यांच्या नियुक्त्या आणि शिक्षकांची शैक्षणिक पात्रता याबाबत 5मे च्या बैठकीत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल, असे पालकांच्या वतीने युसूफ खान यांनी स्पष्ट केले आहे.