Breaking News

सुकापूर-पाली देवद हद्दीतील कचर्याच्या विल्हेवाटीसाठी उपाय करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचा तारांकित प्रश्न

पनवेल ः प्रतिनिधी

कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आरोग्याला धोका निर्माण झाला असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्या अनुषंगाने सुकापूर-पाली देवद हद्दीतील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली, अशी विचारणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे.

सुकापूर-पाली देवद ग्रामपंचायत हद्दीतील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मागणी केली आहे.

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की,  सुकापूर-पाली देवद ग्रामपंचायत हद्दीतील कचरा गामपंचायतीमार्फत गाढी नदीपात्रात टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरते. कचर्‍याला लावलेल्या आगीच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले आहे. 2011च्या जनगणनेनुसार पाली-देवद ग्रामपंचायतीची लोकसंख्या 14 हजार 990 आहे. पाली-देवद असेसमेंट सदरी नोंदवलेली कुटुंबसंख्या सात हजार 727 असून आज रोजीची प्रत्यक्ष लोकसंख्या 40 हजारांपेक्षा जास्त आहे. पाली-देवद  ग्रामपंचायत पनवेल महानगरपालिकेलगतची असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून ग्रामपंचायत हद्दीत निर्माण होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा घनकचरा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमार्फत उचलून गावालगत असलेल्या गुरुचरण जागेतील डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. अशा प्रकारे निर्माण होणारा कचरा डम्प करण्यासाठी पाली-देवद ग्रामपंचायतीकडे गावाबाहेर अन्य ठिकाणी जागा उपलब्ध नाही किंवा ग्रामपंचायतीच्या मालकीचा घनकचरा प्रकल्प नाही. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत निर्माण होणारा घनकचरा पूर्वापार सुरू असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात असल्याची बाब खरी आहे.

कचर्‍याचे नियोजन करण्याकरिता, घनकचरा प्रकल्प उभारण्याकरिता काही घनकचरा प्रकल्पांची पाहणी ग्रामपंचायतींनी केली आहे. तसेच अशा प्रकारे सेवा देणार्‍या कंपनीसोबत चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यांच्याकडील प्रकल्पास आवश्यक असणारी जागा, प्रकल्प उभारणीसाठी होणारा खर्च, प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करून सदरील प्रकल्प लवकरात लवकर उभारणी करण्याची कार्यवाही सुरू असून तशी तरतूद ग्रामपंचायतीने सन 2019-20 सालातील ग्रामपंचायतीच्या वार्षिक अंदाजपत्रकात केली आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीत प्लास्टिकच्या

वापरावर नियंत्रण ठेवण्याकरिता प्लास्टिक बंदी समिती म्हणून एका समितीची रचना करण्यात आली असून त्यांच्यामार्फत हद्दीतील नागरिकांवर तसेच दुकानदारांवर प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply