Breaking News

‘दिबां’च्या नावाला वाढता पाठिंबा

विमानतळ नामकरणासंदर्भात सर्व स्तरांतून समर्थन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असून वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य, पनवेल महापालिका व्यापारी संघ तसेच उरण तालुका वारकरी सांप्रदाय सामाजिक मंडळानेही जाहीर पाठिंबा दिला आहे. आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांनी पनवेल येथे झालेल्या बैठकीत लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय सर्वपक्षीय कृती समितीला दिले. ‘दिबां’च्या नावाला विविध क्षेत्रांतून मिळत असलेला पाठिंबा आणि भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचा निर्धार पाहता गुरुवारी (दि. 24) होणारे सिडको घेराव आंदोलन गाजणार असल्याचे दिसते.
पाठिंबापत्रे स्वीकारतेवेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, रिपाइंचे कोकण अध्यक्ष तथा पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, कॉ. भूषण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, राष्ट्रवादीचे गुलाबराव वझे, कृती समितीचे जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, भाजपचे नेते दशरथ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, कामगार नेते सुरेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याआधीही विविध राजकीय पक्ष, संस्था, आस्थापना यांनी ‘दिबां’च्या नावाला पाठिंबा दिलेला आहे. वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ह. भ. प. अजय महाराज पाटील, पनवेल महानगरपालिका व्यापारी संघाच्या वतीने पनवेल व्यापारी संघाचे अध्यक्ष नारायण ठाकूर, कळंबोली व्यापारी संघाचे अध्यक्ष कमल कोठारी, संजय जैन व इतर व्यापारी संघांचे पदाधिकारी आणि उरण तालुका वारकरी संप्रदाय सामाजिक मंडळाच्या वतीने अध्यक्ष गोपीनाथ ठाकूर व पदाधिकार्‍यांनी पाठिंबा पत्र कृती समितीला दिले.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील लोकजीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहे. अनादी काळापासून तो समुद्रातील दीपस्तंभाप्रमाणे समाजाला दिशा दर्शविण्याचे काम करीत आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांनी कामगार, शेतकरी, कष्टकरी, भूमिपुत्र, ओबीसी समाजाला तसेच बहुजनांना दिशा दर्शविण्याचे काम आयुष्यभर करून अविरत सेवा केली आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक जनआंदोलन उभारून साडेबारा टक्केचा न्याय मिळवून दिला. नगराध्यक्ष, पाच वेळा, आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते अशी पदे भूषवून समाजासाठी सभागृहात आवाज बुलंद करून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. ‘दिबा’साहेबांचे कार्य महान आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भूमिपुत्रांच्या जागेत होत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचे दैवत असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला मिळाले पाहिजे, अशी भूमिका या जाहीर पाठिंब्यातून वारकरी महामंडळ, व्यापारी संघ, उरण वारकरी संप्रदाय यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी अपंग क्रांती संघटनेने मंगळवारी (दि. 22) आपला पाठिंबा जाहीर केला. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे अपंग क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा पत्र सुपूर्द केले. या वेळी अपंग क्रांती संघटना व अपंग उत्कर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष विलास फडके, उपाध्यक्ष बाळा रोडपालकर, तळोजा विभाग अध्यक्ष दत्तात्रेय पाटील, देवदास इंजळ, राजश्री इंजळ, विकास ठाकूर, उज्ज्वला नलावडे, सुरेश वाशीकर, अतुल रायबोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, रायगड समालोचक असोसिएशन, पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या वतीनेही सोमवारी पाठिंबा जाहीर करण्यात आला. आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीला हा पाठिंबा देण्यात आला.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस तथा असोसिएशनचे सल्लागार राजेंद्र पाटील, रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश गायकवाड, कार्याध्यक्ष प्रशांत खानावकर, रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील, पनवेल समालोचक असोसिएशनचे मच्छिंद्र पाटील, पीटीसी लाइव्हचे संस्थापक अध्यक्ष संदीप वास्कर, महेश म्हात्रे, विशाल जितेकर, संतोष म्हात्रे, उमेश खानावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लढा नव्हे तर चळवळ!
यापूर्वीही विविध राजकीय पक्षांचे नेते, सेवाभावी संस्था, संघटना, मंडळे, समाज तसेच ग्रामपंचायती व अन्य आस्थापनांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी ठराव करून आपला पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये रिपाइं (आठवले गट)चे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते हुसेन दलवाई, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे, कुणबी समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष व ओबीसी नेते चंद्रकांत बावकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी ‘दिबां’चेच नाव विमानतळाला देण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. त्याचप्रमाणे पनवेल, उरणसह रायगड, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडीसह ठाणे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनीही आपले समर्थन दिले आहे. अशा प्रकारे ही चळवळ उभी राहिली असून ती वृद्धिंगत होत आहे.

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी अपंग क्रांती संघटनेनेही सर्वपक्षीय कृती समितीला पाठिंबा दिला. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. शारीरिक व्यंग असूनही हे लोक आमच्यासोबत लढाईला तयार आहेत. यावरून सिडको व सरकारने ध्यानात घ्यावे की, येथील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांसह जनतेची इच्छा जबरदस्त आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ‘दिबां’च्या नावासाठी कार्यवाही करावी.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

Check Also

कामोठे कॉलनी फोरमचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याचा ओघ …

Leave a Reply