Breaking News

मोर्बे धरणाची तातडीने दुरुस्ती करावी : आ. प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्या अनुषंगाने धरणाच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगतिपथावर असून लवकरच या धरणाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार आहे.

मोर्बे धरणाची दुरवस्था झाल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून शेतकर्‍यांच्या भातशेतीचेही नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 1973-74 साली बांधलेल्या व दगडी भिंत असलेल्या धरणाची वेळीच दुरुस्ती न केल्याने धरणाला तडे जाऊन अतिवृष्टीत बांध फुटून मोठ्या प्रमाणात जीवित वा वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धरणाच्या दुरुस्तीकरिता सुमारे दोन कोटी 96 लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला असून प्रस्तावास मंजुरी न मिळाल्याने धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही.

यासंदर्भात शासनाने धरणाची पाहणी करून धरणाच्या दुरुस्ती कामाला तत्काळ सुरुवात होण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता.

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी यासंदर्भात दिलेल्या उत्तरात सांगितले की, मोर्बे धरणाची दुरवस्था झाल्याने पाणी वाया जात असल्याची आणि शेतकर्‍यांच्या भातशेतीचेही नुकसान होत असल्याची बाब अंशतः खरी आहे. सांडव्यामधून गळती होत असून ल. पा. योजनेतून दरवर्षी सिंचनासाठी व पिण्यासाठी मंजुरीनुसार पाणीपुरवठा करण्यात येतो. शेतकर्‍यांच्या भातशेतीचे नुकसान होत असल्याबाबत कोणतीही लेखी तक्रार प्राप्त नाही. या सांडव्याच्या गळती दुरुस्तीचे नियोजन असून त्याअनुषंगाने अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ यांनी 3 ऑगस्ट 2018 रोजी धरणाची पाहणी केली असून त्यानुसार दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगतिपथावर आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply