पनवेल ः प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने रसायनीजवळील कष्टकरीनगर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 22) शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पत्रकार म्हणून सामाजिक हित जपणे आमची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुका पत्रकार विकास मंच काम करीत आहे. दरवर्षी विविध शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी कार्यक्रम राबविले जातात. दुर्गम भागात कार्यक्रम राबविण्याचा आमचा संकल्प असतो. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम राबविताना मनाला समाधान लाभते, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार व मंचाचे सल्लागार माधव पाटील, अध्यक्ष प्रशांत शेडगे, माजी अध्यक्ष अविनाश कोळी, संजय कदम, मंदार दोंदे, सरचिटणीस हरेश साठे, नितीन कोळी, राजू गाडे तसेच ग्रामपंचायत सदस्य गुरुबाई राठोड, विश्वनाथ गायकवाड, नंदिनी आटपाडकर, मुख्याध्यापक अशोक नेटके, उपशिक्षिका अनिता वाघमारे, ग्रामस्थ सुनील राठोड, भानुदास गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, रमेश राठोड, सौदागर जाधव, रवींद्र बबाशी, सद्दाम मुल्ला, गणेश राठोड, प्रेम राठोड आदी उपस्थित होते.