मुरूड : प्रतिनिधी
मजगावातील शेतात राहणारे अनिकेत पाटील यांच्या निवासस्थानासमोरच खेकड्यांनी काढलेल्या बिळात साडेचार फूट लांबीचा नाग लपून बसल्याने पाटील यांच्या घरातील सर्व सदस्य भयभीत झाले होते. या वेळी अनिकेत पाटील यांनी वन खात्याला फोन करून तातडीची मदत मागितली. या वेळी वन खात्याने सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण केले. नाग हा बिळातच लपल्याने सर्वजण तो बिळाबाहेर येण्याची वाट पाहू लागले, परंतु दोन तास वाट पाहूनही नाग बाहेर येत नसल्याने अखेर बीळ खोदण्याचा निर्णय सर्पमित्र संदीप घरत यांनी घेतला. यासाठी त्यांनी आजूबाजूला बाहेर पाडण्याचे मार्ग बंद केले व ज्या ठिकाणी बिळात नाग लपला होता ते बीळ खोदण्यास सुरुवात केली. बिळातून नाग पकडणे खूपच थरारक असते व यासाठी सर्पमित्रांना मोठा धोका पत्करावा लागतो, परंतु याची तमा न बाळगता बीळ खोदण्यास सुरुवात करण्यात आली. या वेळी वन खात्याचे कर्मचारीसुद्धा मदतीला होते. बीळ खोदताना नागाचा काही भाग दिसताच तोंडाचा भाग पकडण्यात सर्पमित्र संदीप घरत यांना यश आले. तो नाग नाग पोत्यात भरून त्याला गारंबी जंगलात सुखरूपपणे सोडण्यात आले.