लंडन : वृत्तसंस्था
वर्ल्डकप स्पर्धेत लॉर्ड्सवर रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला. पाकिस्तानच्या धुरंदर गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांच्या अखेरीस 9 बाद 259 धावांवर रोखले. या सामन्यातील पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांचे 7 सामन्यानंतर केवळ 3 गुण आहेत.
पाकने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 309 धावांचे आव्हान दिले होते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस याने 63 धावांची खेळी साकारून संघाच्या विजयी आशा पल्लवित ठेवल्या होत्या. पण पाकिस्तानच्या भेदक मार्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा निभाव लागला नाही. दक्षिण आफ्रिकेचा यंदाच्या वर्ल्डकपमधला हा पाचवा पराभव ठरला आहे.