जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन; सामाजिक न्याय दिन कार्यक्रम
अलिबाग ः प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या भूमीतील एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजातील गोरगरीब, मागासलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सुरू केलेले सामाजिक न्यायाचे कार्य आपण सार्यांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपायुक्त तथा जातपडताळणी समितीचे सचिव विशाल नाईक, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, आनंदराज घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार वितरण तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या लाभाचे लाभार्थ्यांना जिल्हाधिकार्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आनंदराज घाडगे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याविषयी माहितीपर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक किरण मेहेत्रे यांनी केले. विशाल नाईक यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त करून छत्रपती शाहू महाराजांच्या ध्येय धोरणांची महती सांगितली. उपस्थितांचे आभार किरण मेहेत्रे यांनी मानले.
राजर्षि शाहू महाराज जयंतीदिनी अभिवादन
समाज परिवर्तनाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 145व्या जयंतीदिनी महाड तहसील कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयांत छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. समाजातील जातीभेद दूर करत समाज घडविण्याचे मौलिक कार्य करणारे तसेच आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 145वी जयंती महाडमधील सर्व शासकीय कार्यालयांत उत्साहात साजरी करण्यात आली. महाड तहसील कार्यालयात तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष महेश शिंदे, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, समिती सदस्य भाजप महिलाध्यक्षा रश्मी वाझे, गणेश फीलसे, रामचंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.