लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ओळख असणारे सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजला (स्वायत्त) 15 मार्च व 16 मार्च रोजी भेट दिली. फॅकल्टी व स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत ही भेट झाली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या शिक्षक व विद्यार्थीकेंद्रित उपक्रमासाठी शुभेच्छा देत कौतुक केले.
यानंतर सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.पाटील यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास सांगून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या यशाचा मागोवा घेतला. त्याचबरोबर त्यांनी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या नवनवीन संकल्पना उपस्थितांसमोर मांडल्या तसेच इंग्रजी विभागाकडून आयोजित केलेल्या विद्यार्थी केंद्र उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश येवले यांनी आपल्या मनोगतात इंग्रजी विभागाच्या स्थापनेपासून ते आजतागायत केलेल्या प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विभागाकडून दिल्या जाणार्या वेगवेगळ्या विषयांची माहिती दिली.
डॉ. समाधान माने यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाकडून विद्यार्थीकेंद्रित घेतल्या जाणार्या उपक्रमांचा उल्लेख करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शैक्षणिक सामाजिक कामाबद्दल विशेष कौतुक केले व संस्थेस असणार्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. धनंजय साठे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केलेल्या बदलांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाबरोबरच संशोधन केले पाहिजे यावर प्रकाश टाकला.
इंग्रजी विभागाचे डॉ. सूर्यकांत परकाळे यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्था सातारा आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेल यांच्या शैक्षणिक व सामाजिक देदीप्यमान कामगिरीवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना इंग्रजी विभागाच्या विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून राबविण्यात येणार्या वेगवेगळ्या उपक्रमांचा उल्लेख करून संस्थेकडून मिळणार्या पाठबळाबद्दल आभार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनीसुद्धा या औपचारिक चर्चेत भाग घेतला, ज्यामधून पनवेल परिसरातील सामाजिक शैक्षणिक आणि सीकेटी महाविद्यालयात असणार्या वेगवेगळ्या विद्यार्थी केंद्रित सोयीसुविधांची माहिती देण्यात आली.
त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उलवे नोड या ठिकाणीसुद्धा भेट दिली.
या दोन दिवसीय फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राममध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा.कुबेर गायकवाड, प्रा. सुहास शिंदे, सीकेटी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा.अभिजीत हिरे, प्रा.रेणुका गणेश व प्रा.यशिका भगत तसेच दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केला.
या विद्यार्थीकेंद्रित उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हॉइस चेअरमन वाय.टी. देशमुख, सेक्रेटरी डॉ. एस.टी.गडदे यांनी विशेष कौतुक केले.