पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील कशेडी घाटातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील एका वळणावर बुधवारी (दि. 20) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनर्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात घाटरस्ता उतरणार्या कंटेनर चालकाचा पाय अडकून तो जखमी झाला. त्याला बाहेर काढण्यासाठी अडीच तास लागले. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत घाटरस्ता उतरणारा कंटेनर (एमएच-46,बीएफ2448) रमेश आटपळे (रा. माटेगाव, जि. बीड) हा चालवत असताना धोकाप्रवण मोरीच्या क्षेत्रालगत वळणावर रस्त्याच्या विरूध्द दिशेला गेला व घाटरस्ता चढणार्या कंटेनरवा (एमएच-43,वाय-9766) धडकला. अपघातात चालक रमेश आटपळे याचा पाय स्टेअरिंगखाली अडकला आणि ड्रायव्हर केबिनही पूर्णपणे लॉक झाल्याने तो केबिनमध्येच अडकून पडला. या वेळी दुसर्या कंटेनरच्या चालकाने दिवस उजाडेपर्यंत त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
अपघाताची खबर मिळताच पोलादपूर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जेसीबीच्या साह्याने कंटेनरचे ड्रायव्हर केबिन तोडून जखमी ड्रायव्हरची सुटका करून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.