नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वर्ल्ड कपमध्ये आपल्या संथ खेळीमुळे टीकेचा धनी झालेल्या भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची विराट कोहलीकडून पाठराखण करण्यात आली आहे. धोनी एक महान खेळाडू असून, त्याला खेळाची उत्तम जाण आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होत असल्याचे विराटने सांगितले. वेस्ट इंडिजवर दिमाखदार विजय मिळविल्यानंतर विराट प्रसारमाध्यमांशी बोलत होता.
वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांविरोधात केलेल्या संथ खेळीमुळे धोनीवर प्रचंड टीका झाली होती. यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज संघाविरोधातही धोनी अत्यंत धीम्या गतीने धावा करत होता. अखेरच्या षटकात 16 धावा करत केल्याने त्याची धावसंख्या 61 चेंडूंत 56 धावा झाली. या पार्श्वभूमीवर बोलताना विराट म्हणाला की, मधल्या फळीत खेळताना नेमके काय करायचे याची धोनीला योग्य माहिती आहे. एखाद्या दिवशी जेव्हा तो खेळत नाही तेव्हा प्रत्येक जण चर्चा करण्यास सुरुवात करतो, मात्र आमचा नेहमी त्याला पाठिंबा असतो. त्याने आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत
धोनीसारखा खेळाडू सोबत असण्याची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला 15 ते 20 धावांची गरज असते तेव्हा त्या कशा मिळवायच्या हे त्याला अगदी बरोबर माहिती आहे. त्याचा अनुभव 10 पैकी 8 वेळा यश मिळवून देतो, असे विराटने सांगितले.
– फलंदाज क्षमतेप्रमाणे खेळताहेत
भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले असल्याच्या प्रश्नावर बोलताना विराटने सांगितले की, आम्ही नुकतेच पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. खरे सांगायचे तर आम्ही गेल्या अनेक काळापासून चांगला खेळ करीत असून पुढेही करणे गरजेचे आहे. फलंदाजीच्या बाबतीत गेल्या दोन सामन्यात आम्ही चांगला खेळ करु शकलो नाही, पण तरीही विजय मिळवला ही सुखावणारी गोष्ट आहे. मला माझ्या फलंदाजांना काही सांगण्याची गरज नाही. ते आपल्या क्षमतेप्रमाणे योग्य खेळी करीत आहेत, असेही विराटने या वेळी नमूद केले.