पनवेलमध्ये नागरिकांना मास्कबाबत आवाहन, रुग्णवाढ गांभीर्याने घ्या; नियमांचे पालन करा
पनवेल : वार्ताहर
आमोयक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल परिसरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका व तालुका प्रशासनाच्या वतीने मास्क न घालणार्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सोबतच नागरिकांना मास्क घालण्यासाठी आवाहनही करण्यात आले आहे.
मास्क न वापरणार्यांवर कारवाई केली जात असल्याने अनेक जण वेगवेगळे जुगाड करताना दिसत आहे. केवळ कारवाई पासुन बचाव व्हावा याकरिताच मास्क वापरण्याची प्रक्रिया केवळ काहीजण पूर्ण करीत आहेत. पालिकेच्या माध्यमातुन अशा नागरिकांवर कारवाई देखील केली जात आहे, मात्र अद्यापही काही नागरिक कोरोनाबाबत जागरूकता दाखवीत नसल्याचे लोकांकडून केल्या जात असलेल्या जुगाडावरून स्पष्ट होत आहे.
पनवेलमध्ये तिसर्या लाटेला सुरुवात झाली आहे. दररोज किमान 1500 रुग्णांची भर यामध्ये पडत आहे. सध्याच्या घडीला कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 8410 एवढी आहे.त्यामुळे कोरोनाबाबत सतर्क राहण्याची गरज आहे.
पालिका क्षेत्रात केलेल्या कारवाईत विना मास्क तसेच इतर कोविडचे नियम पायदळी तुडविल्याप्रकरणी जवळपास 50 हजारापेक्षा जास्त दंड वसुल केला आहे. यामध्ये शेकडो नागरिकांना मास्क घातला नसल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. चांगल्यातला चांगला मास्क 50 रुपयांपर्यंत मिळतो. वापरा आणि फेका सारखे मास्क देखील अवघ्या पाच रुपयांना मिळत असताना तो न घालता 500 रुपयांचा दंड कशासाठी भरायचा याबाबतदेखील मास्क न घालणार्या नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे. तसेच प्रशासकीय पातळीवर नियमांची अंमलबजावणी झाली तर नागरिक देखील संबंधित नियमांचे पालन करतात. नागरिक मास्क घालत नसल्याचे दिसून येतात, मात्र यामध्ये पोलीसदेखील मास्क घालत नसल्याचे दिसून येतात.
पनवेल महापालिका प्रशासन आणि तहसीलदार विजय तळेकर व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या निर्देशानुसार मंडळ अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील यांच्यावतीने विना मास्क फिरणार्या व आस्थापनांमध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितपणे आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढला तरीही नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे संसर्गामध्ये आणखीनच वाढ होत आहे. हे टाळण्यासाठी नागरीकांना मास्क घालण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे, परंतु काही नागरिक व आस्थापना अद्यापही मास्क वापरत नसल्यास तालुका व महापालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
नागरिकांनी खबरदारी बाळगण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. तसेच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणे हि त्रिसुत्री दैनंदिन जीवन जगताना आवश्यक अंगी कारावी, असे आवाहन तहसीलदार विजय चिपळेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
कोरोनापासून बचावासाठी त्रिसूत्रीचा पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये मास्क हा अंत्यंत महत्वाचा घटक असुन कोरोनापासून बचावासाठी तो महत्वाचा घटक आहे.
-डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका