नागोठणे : प्रतिनिधी
अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या पावसाचे अखेरीस गुरुवारी सायंकाळपासून दमदारपणे आगमन झाले आहे. या पावसाने बळीराजा सुखावला असून सोमवारपासून या भागात भात लावणीच्या कामाला सुरुवात होईल, असे शेतकर्यांकडून सांगण्यात आले.
नागोठण्यात गुरुवारी सायंकाळी सुरुवात केल्यानंतर रात्री नऊनंतर पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडण्यास प्रारंभ झाल्याने तलाव तसेच विहिरी पाण्याने भरून गेल्या आहेत. काही ’सुशिक्षित’ नागरिक घरातील प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, जुन्या गाद्या, कपडे गटारात फेकत असल्याने काही भागात पाणी तुंबून रस्त्यावर आल्याने गटारे साफ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांची त्यानिमित्ताने धांदल उडाली होती.