अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याला शुक्रवारी (दि. 28) मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. कामावर निघालेले नोकरदार आणि शाळा-कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला. दरम्यान, या पावसामुळे जलसंकट टळले असून, बळीराजाही सुखावल्याचे चित्र आहे.
गेल्या महिनाभरापासून रुसून बसलेला मान्सून अखेर जिल्ह्यात सक्रिय झाला. गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही पावसाने दमदार बॅटींग केली. पनवेल, पेण, रोहा, महाड, पोलादपूर, अलिबाग, सुधागड येथे पावसाच्या जोर कायम होता. उरण, मुरूड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा, माणगावमध्येही पावसाची संततधार होती. सर्व तालुक्यांना या पावसाने झोडपले असून, काही सखल भागांमध्ये पाणी साचले होते.
पाऊस पडण्यास प्रारंभ झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे, तर तलाव, विहिरी भरून गेल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्याची सुचिन्हे आहेत. दुसरीकडे, शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.
दरम्यान, येत्या 24 तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकिनार्यावरील, तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
– माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळली
कर्जत : जोरदार पावसामुळे नेरळ-माथेरान घाटरस्त्यात नागरखिंड येथे गुरुवारी रात्री दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही, पण माती आणि दगडे रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. टॅक्सी संघटनेच्या चालकांनी दगड-माती बाजूला सारून वाहतूक पूर्ववत केली, तर शुक्रवारी (दि. 28) सकाळी ठेकेदाराने आपली माणसे लावून रस्ता साफ केला.
– रेल्वे आणि रस्ते सेवेवर परिणाम
मुंबई : मुंबईसह नवी मुंबई, ठाणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वेसेवेला बसला. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून लोकल वाहतुकीचा वेग मंदावला. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर हार्बर मार्गावरील वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू होती. पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम दिसून आला.