खालापूर : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील करंबेळी गावात डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. त्याच्यासह अन्य तीन संशयित रुग्णांवर वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
करंबेळीत गेल्या दोन-चार दिवसांपासून तापाची साथ आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यातील गणेश महाडिक (27) याला अशक्तपणा जाणवू लागल्याने वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले असता, त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आकांक्षा पॉल यांनी या गावातील सर्व लोकांची तपासणी केली. यात आणखी तिघांमध्ये डेंग्यूची लक्षणे असल्याचे जाणवले. त्यांनाही आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, तालुका आरोग्य अधिकारी रोकडे वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी संजय भोये, पं.स. सदस्य उत्तम परबळकर, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी नरेश पाटील यांनी करंबेळी गावाला भेटी दिल्या आहेत.
– करंबेळी येथे दोन रुग्ण आढळले, परंतु ते डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झालेले नाही. गावात पाण्याच्या साठवण टाक्यांची तपासणी केली असता, तेथे मात्र डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. येथे फवारणी करण्यात आली आहे, तर तालुक्यात डेंग्यूबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. -डॉ. रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी, खालापूर