Breaking News

रायगड संघाचा नंदुरबार संघावर दणदणीत विजय

नैतिक सोळंकीचे सामन्यात 13 बळी; स्मित पाटीलच्या आक्रमक 111 धावा

पनवेल : वार्ताहर  
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथे सुरू असलेल्या, 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत रायगड संघाने नंदुरबार संघावर एक डाव आणि 194 धावांनी दणदणीत विजय संपादन केला.
नाणेफेक जिंकून नंदुरबार संघाने फलंदाजी स्वीकारली, परंतु त्यांचा संपूर्ण डाव 56 षटकात 154 धावात संपला. नैतिक सोळंकी या लेगस्पिन गोलंदाजाने 14 षटकांत 38 धावा देत सहा बळी घेतले. त्याला शुभम पाटील याने दोन व अमेय पाटील व सर्वेश ऊलवेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेत छान साथ दिली. नंदुरबार संघाचे पहिले पाच फलंदाज 37 धावात बाद झाल्यानंतरसुद्धा उर्वरित पाच फलंदाजांनी 117 धावा वाढवल्या व संघाला 154 धावांचा पल्ला गाठून दिला.
रायगड संघाचे प्रबंधक/प्रशिक्षक जॉन्टी गिलबिले यांनी आखून दिलेल्या योजनेनुसार सर्व खेळाडूंनी तसा खेळ करत, 64.5 षटकांमध्ये सात बाद 413 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला व पहिल्या डावात 259 धावांची आघाडी घेतली. सर्वेश ऊलवेकर 38 (33) व अमित शर्मा 17 (21) यांनी 64 धावांची सलामी दिली. दुसर्‍या गड्याकरीता अमित शर्मा 34 (47) क्रिश पाटील 24 (46) या दोघांनी 93 चेंडूत 66 धावांची भर घातली. अमित शर्मा 51 (68) धावांवर बाद झाला. क्रिशने 43 (55) धावा केल्या. तीन बाद 155 वरून धावफलक पाच बाद 182 असा झाला असताना सहाव्या गड्या करता ओम म्हात्रे 78 (91) व स्मित पाटील 99 (98) उर्वरित 27 अतिरिक्त यांनी 189 चेंडूत 204 धावांची आक्रमक भागीदारी नोंदवीली. स्मित याने 99 चेंडूत 17 चौकारांच्या सहाय्याने आपले शतक पूर्ण केले. त्याने 106 चेंडूत 111 धावांची आक्रमक व संघाच्या गरजेनुसार खेळी केली, तर कप्तान ओम म्हात्रेने 78(92)धावांची खेळी 14 चौकारांच्या सहाय्याने साकारली. नैतिक सोळंकीने 26 (19) व अमेय पाटीलने 15 (7) धावा केल्या.
नंदुरबार संघाच्या दुसर्‍या डावात देखील, नैतिक सोळंकी याने 13 षटकांत 10 धावा देत सात बळी घेतले व नंदुरबार संघाचा पराभव निश्चित केला. नैतिकने 20व्या षटकात कमाल केली. त्यामुळे नंदुरबार संघाचा धावफलक चार बाद 58 वरून सात बाद 59 असा झाला. दुसर्‍या बाजूने अमय पाटील याने दोन बळी व राहुल सिंग याने एक बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply