पनवेल : बातमीदार – पनवेल महापालिकेचे देहरंग धरण शुक्रवारपासून भरून वाहू लागल्याने लवकरच शहरात सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पनवेल शहरात म्हणजेच तत्कालीन नगरपालिकेच्या साडेतीन चौरस किलोमीटरच्या हद्दीत महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहराला लागणार्या 26 एमएलडी पाण्यापैकी देहरंग धरणातून 12 ते 15 एमएलडी होणारा पाणीपुरवठा डिसेंबर 2018 मध्ये बंद झाल्यामुळे शहरात सध्या फक्त एमआयडीसी आणि जीवन प्राधिकरणाच्या उसनवारीच्या पाण्यावर पाणीपुरवठा केला जात आहे. देहरंग धरणातील पाणी संपल्यामुळे सहा महिन्यांपासून पनवेलकर प्रचंड पाणीटंचाईचा सामना करीत असून एक दिवसाआड तुटपुंजे पाणी मिळते. पावसाला उशीर झाल्यामुळे हे पाणीसंकट दूर होण्यास उशीर होतो की काय, असा प्रश्न उपस्थित होत होता, मात्र दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने देहरंग धरण शुक्रवारपासून ओसंडून वाहू लागले आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेले धरण माथेरानच्या डोंगररागांवर पाऊस पडला तरी लागलीच भरते.
48 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देहरंग भरले आहे. 3.57 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या देहरंग धरणातून नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. सुरुवातीला धरणातील पाणी गढूळ असल्यामुळे लागलीच धरणातून पाणीपुरवठा करता येत नाही, मात्र येत्या चार दिवसांत धरणातून 12 ते 15 एमएलडी पाणीपुरवठा करता येऊ शकतो, अशी परिस्थिती सध्या आहे. पावसाळ्यात शहरात फिरणारे टँकर बंद करण्यासाठी महापालिका प्रशासन लवकरच निर्णय घेऊन एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचे धरण भरले, ही वस्तुस्थिती असली तरी तातडीने धरणातून पाणीपुरवठा करता येणे शक्य नाही, मात्र येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे. लवकरच पनवेल शहरातील नागरिकांची पाणीटंचाई दूर होईल, अशी शक्यता आहे.
-उल्हास वाड, जलअभियंता, पनवेल महापालिका