पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ची सभा शुक्रवारी (दि. 22) झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या सभेस महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.
या सभेत आसूडगाव, हनुमानपाडा येथील भाऊ भोपी ते दिनकर तांबडे यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, टेंभोडे गावातील हनुमान मंदिरासमोरील पटांगणामध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, टेंभोडे गावातील दशरथ पाटील यांच्या घरापासून ते बाळाराम म्हसकर यांच्या घरापर्यंत गटारे सिमेंट काँक्रीट करणे, वळवली सागवाडी येथील संगम चौधरी यांच्या घरापासून ते राजेश पारधी यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, वळवली बौद्धवाडी येथील अनंता कांबळे यांच्या चाळीपासून ते गावातील जुना काँक्रीट रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता काँक्रीट करणे, तसेच जुन्या काँक्रीट रस्त्यापासून ते बौद्धवाडी विहिरीपर्यंत सिमेंट रस्ता काँक्रीट करणे, वळवली येथील पाटील स्मशानभूमीपासून ते दशरथ राजाराम चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे, वळवली सागवाडी आदिवासी वाडीसाठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, कळंबोली गावातील श्री काळभैरव मंदिराच्या मागच्या बाजूला एकनाथ जळे यांच्या घरासमोरील गटार व रस्ता तयार करणे, तसेच संदीप भगत चाळ ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता व गटार तयार करणे आदी कामांबाबत साधकबाधक चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या कामांमुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगले रस्ते मिळणार आहेत. ही सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याबाबतही सभेमध्ये सर्व मान्यवरांत सकारात्मक चर्चा झाली.