उरण ः वार्ताहर
पावसाळा सुरू असल्याने जंगलातील रानभाज्यांनी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. नेहमीच्या भाज्यांचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. त्या मनाने या पावसाळी हंगामात मिळणार्या रानभाज्या या स्वस्त दरात मिळत असल्याने रानभाज्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. उरण शहरात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाजूला महाराष्ट्र स्वीट जवळ, गांधी चौक, राजपाल नाका, आनंद नगर आदी ठिकाणी आदिवासी महिलावर्ग रानभाज्या विकताना दिसत आहे.
पावसाळ्यात डोंगरात मिळणार्या व औषधी गुणधर्म असणार्या भाज्या म्हणजे टाकळा, भारंग, कुलू, कंटोळी, कांद कुर्डू शेवळी यासारख्या भाज्या आदिवासी बांधव गोळा करून त्याची बाजारपेठेत विक्री करून आपली उपजीविका करतात. यासारख्या रानभाज्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने सध्या या भागातील बाजारपेठा या रानभाज्यांनी गजबजून गेल्या आहेत. या प्रकारच्या रानभाज्या या पावसाळ्यातच मिळत असल्याने खवय्यांनादेखील या रानभाज्यांचे वेध लागलेले असतात.
उरण बाजारपेठेत कुर्डू भाजी 20 रुपयाला 2 जुड्या, भारंगी 20 रुपयाला 3 जुड्या, कुलू 20 रुपयाला 2 जुड्या, टाकळा 20 रुपयाला तीन जुड्या व कंद 50 रुपयास एक वाटा असे
दर आहेत.