नवरात्रोत्सवाची सांगता; मिरवणुकांमध्ये उत्साह
अलिबाग ः प्रतिनिधी
साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण पारंपरिक पद्धतीने सर्वत्र साजरा झाला, तसेच नऊ दिवस सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाचीही बुधवारी (दि. 5) सांगता झाली. कोरोनाच्या सावटामुळे दोन वर्षे असलेले निर्बंध आता उठल्यामुळे यंदाचा नवरात्र उत्सव आणि दसरा सण उत्साहात साजरा झाला. पावसामुळे मिरवणुकांमध्ये थोडा व्यत्यय आला, मात्र नागरिकांचा उत्साह कायम असल्याचे पहायला मिळाले. मागील दोन वर्षे नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे तरूणाईमध्ये काहीसा निरूत्साह होता. यंदा मात्र निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला. नऊ दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर बुधवारी देवींच्या मुर्तीचे समुद्र, नदी, तळ्यात विसर्जन करण्यात आले. दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा… याची प्रचिती बाजारपेठांमध्ये दुकानांमध्ये झालेली गर्दी आणि मोठ्या प्रमाणात झालेली वाहन खरेदी यातून आली. दसर्यानिमित्त घराघरात उत्साहाचे वातावरण होते. घरोघरी पूजाअर्चा, शस्त्रास्त्र पूजन झाले. व्यापार्यांनीही आपल्या दुकानातील वजनमापे व अन्य साहित्याची पूजा केली. दसर्याच्या निमित्ताने जिल्ह्यात लाखो रुपयांची उलाढाल झाली. सोन्याच्या भावातील चढ-उतार बघून नागरिकांनी मुहूर्त साधला आणि सोने खरेदी केले. टीव्ही., फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशिनसारख्या नित्योपयोगी वस्तूंचीही खरेदी झाली. अनेक ठिकाणी नवीन दुकानांचे उद्घाटन झाले. बांधकाम क्षेत्रातही नवीन कामांचे भूमिपूजन करण्यात आले. दसर्यानिमित्त श्रीखंडाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सायंकाळी देवींच्या मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पारंपरिक नृत्य आणि गरब्याच्या तालावर विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. काही ठिकाणी सायंकाळच्या सुमारास पडलेल्या पावसाने मिरवणुकांमध्ये व्यत्यय आला, मात्र भक्तांमधील उत्साह कमी झाला नव्हता. सोन्याचे प्रतिक म्हणून आपट्याची पाने लुटत एकमेकांना दसर्याच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मिडियावरही दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.