विशाखापट्टणम : वृत्तसंस्था
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला ट्वेन्टी-20 सामना रविवारी (दि. 25) विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून लोकेश राहुल भारतीय संघात पुनरागमन करणार असून, रिषभ पंतलाही आघाडीला खेळण्याची संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणार्या भारतीय संघाला ट्वेन्टी-20 मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पावसामुळे मालिकेतील अंतिम सामना रद्द झाला होता, पण ही कसर भरून काढण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दोन टी-20 आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे.
कर्णधार विराट कोहलीही या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. आगामी वर्ल्डकप लक्षात घेता लोकेश राहुल व रिषभ पंत यांना छाप पाडण्याची अखेरची संधी आहे. त्यामुळे या मालिकेतील त्यांच्या कामगिरीकडे निवड समितीसह क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. राहुलला सलामीला खेळता यावे यासाठी शिखर धवन किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी एक माघार घेऊ शकतो.