कर्जत : बातमीदार
नेरळ वन विभागाने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने नेरळ, शेलू आणि बेडीसगाव येथे पहिल्या टप्प्यात विविध जातींच्या 16500 रोपांची लागवड केली.
वन विभागाने नेरळ परिसरातील वृक्षप्रेमींना बोलावून येथील फॉरेस्ट टेकडीवर वन महोत्सव साजरा केला. त्यात कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या हस्ते झाडे लावण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वन क्षेत्रपाल नारायण राठोड यांनी वन महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत वृक्ष लागवडीचे महत्व विशद केले. येथील वन महोत्सवात नेरळ फॉरेस्ट टेकडीवर तब्बल 5555 झाडे लावण्यात आली. यावेळी नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे सदस्य तसेच नेरळ विद्या मंदिर आणि माणगाववाडी येथील आदिवासी आश्रमशाळा या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
शेलू येथील कल्याण-कर्जत राज्यमार्ग लगत असलेल्या वन जमिनीवर सरपंच शिवाजी खारीक यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून वन महोत्सवाला सुरुवात झाली. वनक्षेत्रपाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दत्तात्रय निर्गुडे, शंकर पवार यांनी नियोजन करून 5555 झाडांची लागवड करून घेतली. तसेच या महोत्सवात बेडीसगाव येथेही संरक्षित वन परिसरात 5555 झाडांची लागवड करण्यात आली.
माजी उपसरपंच मंगल दरवडा यांच्या हस्ते झाडाची लागवड करून या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयचे विद्याथ्यार्ंनी या मोहीमेत सहभाग घेतला होता. नेरळ वन विभागाचे वतीने 16500 झाडांची लागवड पहिल्या टप्प्यात आणि एका दिवशी करण्यात आली. त्यावेळी साग, खैर, करंज, शिसव, आवळा, बांबू, बेहडा, काजू, चिंच, उंबर, अशा प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.