वॉर्सा : वृत्तसंस्था
भारतीय स्टार धावपटू हिमा दासने पोलंडमध्ये झालेल्या पोन्जान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले आहे. हिमाने 200 मीटर अंतर केवळ 23.65 सेकंदांमध्ये पूर्ण करीत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. ट्विटरच्या माध्यमातून हिमाने ही माहिती दिली.
400 मीटर स्पर्धेतील वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. पोलंडमधील स्पर्धेत तिने पुनरागन केले. हिमाने सहभाग घेतलेला ही वर्षातील पहिलीच स्पर्धात्मक शर्यत होती. याआधी तिने 23.10 सेकंदांत 200 मीटर अंतर पार केले असून, हा तिचा सर्वोत्तम वैयक्तिक विक्रम आहे.
गतवर्षी तिने ही कामगिरी बजावली होती.
हिमा दासव्यतिरिक्त भारताची धावपटू व्ही. के. विस्मायाने 23.75 सेकंदांत अंतर पार करीत कांस्यपदक जिंकले. दुसरीकडे पुरुषांच्या 200 मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने 20.75 सेकंदाची वेळ घेत तिसरे स्थान मिळवले, तर 400 मीटर स्पर्धेत के. एस. जीवन यालाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या सर्वांचे कौतुक केले जात आहे.