Saturday , March 25 2023
Breaking News

विंडीजचा शेवट गोड ; अखेरच्या सामन्यातही अफगाणिस्तानची हार

लीड्स : वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करीत विश्वचषक स्पर्धेचा समारोप गोड केला. 312 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ 288 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या संघाला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही.

अफगाणिस्तानकडून यष्टीरक्षक इक्रम अलीने 86, तर रेहमत शाहने 62 धावांची खेळी करत चांगली झुंज दिली, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने चार, केमार रोचने तीन, तर ख्रिस गेल व थॉमस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अफगाणिस्तानचा एक फलंदाज धावबाद झाला.

अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार गुलबदीन नैब स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर रेहमत शाह आणि इक्रम अलीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर रेहमत माघारी परतला. यानंतर नजीबउल्ला झरदान आणि असगर अफगाण यांनी फटकेबाजी करीत धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला, मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर त्यांच्या डावाला गळती लागली.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ख्रिस गेल माघारी परतल्यानंतर नंतरच्या सर्व फलंदाजांनी अफगाणी गोलंदाजांचा समाचार घेतला. विंडीजच्या इव्हिन लुईस (58), शे होप (77) आणि निकोलस पुरन (58) यांनी अर्धशतक झळकाविली, तसेच जेसन होल्डरने 45 धावांची जलद खेळी केल्याने त्यांना अफगाणिस्तानपुढे 312 धावांचे आव्हान ठेवता आले. अफगाणिस्तानकडून दौलत झरदानने दोन, तर सय्यद शिरझाद, मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. विंडीजचा एक खेळाडू धावबाद झाला.

– गेलचा अलविदा! वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाजल ख्रिस गेलचा हा विश्वचषक स्पर्धेतील अखेरचा सामना होता. या सामन्यात तो लवकर बाद झाला, पण गोलंदाजीत त्याने एक बळी मिळविला. सामना विंडीजने जिंकून गेलला अनोखी भेट दिली.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply