पेण : प्रतिनिधी – शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदेबरोबरच सामाजिक संस्था, खाजगी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अशी अग्रेसर असणारी मंडळी व संस्थांना बरोबर घेऊन वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा कार्यक्रम आहे. या अनुषंगाने नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण न.प. सभागृहात वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वृक्ष लागवड मोहिमेस सोमवारी (दि. 8) प्रारंभ होत असून पहिल्या टप्प्यात महाडिकवाडी बायपास रोड, डम्पिंग ग्राऊंड अंबेगाव येथील परिसरात वृक्षारोपण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीला गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, माजी बांधकाम सभापती प्रकाश पाटील, वृक्षप्रेमी सतीश पोरे, डॉ. अशोक भोईर आदींसह विविध संस्थेचे व शाळेचे शिक्षक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवित असताना त्या झाडाचे संवर्धन करणेही तितकेच गरजेचे असून याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे. यासाठी ज्या संकल्पना, सूचना उपस्थित मान्यवरांनी मांडल्या आहेत त्यांचे पालन होणे गरजेचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता इसळ यांनी केले.