श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना व्हायरस व त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि भाजपच्या वतीने खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या अन्नछत्राला भेट देऊन गरजूंना जेवण वाटप केले.
पनवेलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुणोथ इम्प्रेस सोसायटी, खारघरमध्ये शिवमंदिर आणि कामोठे येथे सुषमा पाटील विद्यालय येथे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून हे अन्न फॉईल कंटेनरमध्ये पॅक करून आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून वाटप केले जात आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले असून याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निःस्वार्थपणे केल्या जाणार्या कामाचे कौतुक केले तसेच अन्नछत्राला जागा देणार्यांचे आभार व्यक्त केले आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत हे अन्नछत्र सुरू राहणार असून गरजूंनी निसंकोचपणे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबून लवकरच लॉकडाऊनची परिस्थिती संपावी तसेच या रोगाच्या लाटेतून मुक्तता मिळावी यासाठी प्रशासन काम करीत आहे, परंतु लॉकडाऊनच्या परिस्थितीत हॉटेल आणि खानावळीही बंद आहेत. त्यामुळे बेघर, मजूर, हातावर पोट असणार्या नागरिकांनी उपाशी राहू नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते जीवनावश्यक वस्तू, अन्नछत्र व इतर मदत करीत आहेत. नागरिकांकडूनही या उपक्रमांचे कौतुक करून धन्यवाद दिले जात आहेत.