उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या आजूबाजूला असणार्या रानसई या ग्रामपंचायत हद्दीतील सहा वाड्यांच्या एक हजार आदिवासी बांधवाना वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्याची कायमची पाणी टंचाईच्या समस्येतून मुक्तता करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.
रानसई ग्रामपंचायत हद्दीतमध्ये सहा आदिवासी वाड्या आहेत. त्या पैकी तीन वाड्यामधील महिला वर्ग एकाच हापशी वरून पाणी भरत आहेत. हापशी वर एक-एक हंडा भरण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. मजुरी करून पोट भरणार्या आदिवासी महिलांना मजुरी सोडून पाणी भरण्यासाठी घरीच थांबावे लागत आहे. हे वर्षानुवर्षे चालूच राहिले आहे. रानसई धरणाच्या 40 वर्षानंतर या आदिवासी बांधवांची धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था निर्माण झाली आहे.
मात्र या आदिवासीच्या पाणी समस्या सोडविण्यासाठी मे महिन्यात दरवर्षी ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यावर हजारो रुपये खर्च केले जात आहेत. रानसई आदिवासी बांधवांना भेडसावणारी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायत आणि उरणच्या आमसभेत ठराव मांडण्यात आला होता. हेटवणे पाणी पुरवठा जोडणी वरून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. परंतु या योजना लाखो रुपये खर्च करूनही बारगळल्या आहेत. या योजना पुन्हा कार्यन्वित करून सुरू करून येथील आदिवासी बांधवाना वर्षानुवर्षे भेडसावणार्या पाण्याच्या समस्येतू सोडवावे, अशी मागणी आदिवासी बांधवाकडून केली जात आहे.