Tuesday , March 28 2023
Breaking News

सिडकोकडून प्रकल्पांसाठी भरीव तरतूद

11 हजार कोटी रुपयांचा अंदाजपत्रकात निधी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळाच्या 2019-20 या वर्षाकरिताच्या अंदाजपत्रकास सिडको संचालक मंडळातर्फे नुकतीच मंजुरी देण्यात आली. सिडकोच्या नवी मुंबई व नवीन शहरे प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांकरिता या अंदाजपत्रकात 11 हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोची धुरा हाती घेतल्यापासून विविध प्रकल्पांच्या कामास वेग आला आहे.

महामंडळास 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत अपेक्षित महसूल, खर्च व तूट आदी घटक, तसेच महामंडळाच्या विविध विभागांकडून पुरविण्यात आलेली माहिती यांच्या आधारावर या अंदाजपत्रकाची आखणी करण्यात आली होती. या अंदाजपत्रकानुसार सिडकोला 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता 7797 कोटी रुपये उत्पन्न, 11260.17 कोटी रु. खर्च; तर 3462.63 कोटी रु. तूट अपेक्षित आहे.

नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रणी असलेल्या सिडकोचे 2019-20 हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सिडकोच्या नजीकच्या काळात आकारास येणारे आणि प्रस्तावित असलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांकरिता या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. सिडकोचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, नेरूळ-उरण रेल्वे, परिवहन केंद्रीत विकासावर आधारित 89,771 घरांची गृहनिर्माण योजना, पालघर जिल्हा मुख्यालय, खारघर सांस्कृतिक संकुल यांसारखे नगर विकासाशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रकल्प नजीकच्या काळात साकार होणार आहेत. प्रकल्पांच्या तांत्रिक बाबींकरिता येणारा खर्च व प्रकल्पबाधितांना द्यावा लागणारा मोबदला या दोन प्रमुख बाबींचा विचार करून 11 हजार कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमेची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. 

सद्यस्थिती पाहता या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील 93% विकासपूर्व कामे पूर्ण झाली आहेत; तर प्रकल्पबाधितांच्या स्थलांतराचे 83% काम पूर्ण झाले आहे.

नवी मुंबई मेट्रोच्या प्रस्तावित चार मार्गांपैकी बेलापूर-पेंधर या पहिल्या मार्गावर नोव्हेंबर 2019मध्ये मेट्रोची चाचणी होणे अपेक्षित आहे; तर नेरूळ-उरण मार्गावरील नेरूळ ते खारकोपर या स्थानकांदरम्यानच्या मार्गावर उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे.

परिवहन केंद्रीत विकासावर आधारित 89,771 घरांच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत नव्याने भूसंपादन न करता नवी मुंबईच्या विविध नोड्समधील बस व ट्रक टर्मिनल, रेल्वे स्थानक फोर कोर्ट एरिया येथे घरे बांधणे प्रस्तावित आहे. यामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेमध्ये लक्षणीयरीत्या बचत होणार आहे. पालघर जिल्हा मुख्यालय व नवीन शहर प्रकल्पांतर्गत नवनिर्मित पालघर जिल्ह्यासाठीचे मुख्यालय व तेथील महत्त्वाच्या शासकीय इमारती, तसेच पालघर नवीन शहर सिडको विकसित करणार आहे. भौतिक सोयीसुविधांपलीकडे मानवी मनाच्या सांस्कृतिक व कलाविषयक गरजा लक्षात घेऊन सिडकोतर्फे खारघर येथील उत्सव चौकाजवळील राज्य विद्युत मंडळाच्या भूखंडावर सांस्कृतिक संकुल प्रस्तावित असून, या संकुला अंतर्गत कला दालन, वस्तुसंग्रहालय आणि कला केंद्र विकसित करण्यात येणार आहे.

सिडकोच्या विविध प्रकल्पांकरिता करण्यात आलेल्या 11 हजार कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीमुळे या प्रकल्पांची अंमलबजावणी नियोजित वेळेत करणे शक्य होणार आहे, असे मत सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत बोलताना व्यक्त केले.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply