Breaking News

एक्स्प्रेस वेवर अपघात; चालकास सुरक्षित बाहेर काढण्यात यश

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी उतारावर बुधवारी

(दि. 10) पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रक व टेम्पोत भीषण अपघात घडला. यात ट्रक चालक व क्लिनर सुरक्षित राहिले मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले. तसेच टेम्पो चालक जखमी अवस्थेत आत अडकला होता. त्याला आयआरबी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि महामार्ग पोलिसांनी टेम्पोतून सुरक्षित बाहेर काढून लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खोपोली पोलीस स्टेशन हद्दीतील आडोशी तीव्र उतारावर बुधवारी पहाटे टेम्पोने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रकचे  कोणतेही मोठे नुकसान झाले नाही, मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले व चालक रशीद शेख (रा. दमन, गुजरात) हा जखमी अवस्थेत टेम्पोत अडकून पडला होता. सदर अपघाताची माहिती मिळताच आयआरबी यंत्रणा व महामार्ग वाहतूक पोलिसांनी तत्काळ मदत केल्याने चालकाचा प्राण वाचला. यादरम्यान काही वेळ एक लेनवरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागोठणे : भरधाव वेगातील ट्रेलर (डीएन-09,एम-9807) आणि  मोटारसायकल (एमएच-06,बीवाय-4154) यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेअकराच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर बाहेरशीव फाट्यावर असणार्‍या हर्ष धाब्यानजीक घडला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव अ. रजाक अ. रेहमान उलडे (53) असे असून, ते मुरूडचे रहिवासी आहेत.

ट्रेलर नागोठणे बाजूकडे तर मोटारसायकल वडखळ बाजूकडे चालली होती. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस दर्जाचा डॉक्टर नसल्याने शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह रोहे येथे नेण्याची वेळ आली असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता तरी यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

खोपोली : अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकर दिल्याने खालापूर तालुक्यातील पौध गावाजवळ मंगळवारी (दि. 9) रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दीपक प्रल्हाद सोनटक्के (28, रा. चौक) यांचा जागीच मृत्यू झाला.

दीपक प्रल्हाद सोनटक्के हे खालापूर तालुक्यातील माडप- पौध येथील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. मंगळवारी रात्री 11 वाजता ड्युटी बजावून ते मोटारसायकल (एमएच-46,बीजी-0262)वरून घरी येत होते. सावरोली-खारपाडा मार्गावरील पौध गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.  या  अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply