Breaking News

माणगाव परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच!

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : प्रतिनिधी

होळी उत्सवात सलग तीन दिवस सुट्या आल्याने चाकरमानी मिळेल त्या वाहनांनी कोकण व तळ कोकणात जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांना होळीची पूजा वेळेवर करता आली नाही. रविवारी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाला  महाड येथे आलेल्या भिमसैनिकांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे माणगाव परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

माणगाव-इंदापूर येथील मुख्य बाजारपेठेतून जाणार्‍या रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या दोन्ही बाजारपेठेला बायपास काढला असून याचे अपूर्ण काम असल्याने या वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक फटका बसला आहे.

होळी हा कोकणातील सर्वात मोठा सण असून या सणासाठी मुंबई, सुरत, पुणे येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या मूळ गावी आवर्जून येतात. या वेळी सलग तीन दिवस सुट्या आल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र या चाकरमान्यांना आपल्या गावी जाताना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव, इंदापूर, लोणेरे या शहराच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती. त्याचबरोबर रविवारी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा वर्धापनदिन असल्याने मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी महाडमध्ये आले होते. त्यामुळे  मुंबई-गोवा महामार्गावर लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. याच वेळी होळी उत्सवासाठी मूळगावी गेलेल्या नागरिकांनी परतीचा प्रवास सुरु केल्याने माणगाव परिसरातील वाहतूक कोंडीत भर पडली. या सर्वांनाच या वाहतूक कोंडीचा फटका बसला.

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर, माणगाव येथील बायपासचे काम पूर्ण झाल्यास माणगावमध्ये होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, अशी आशा प्रवाशांना वाटत आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply