Breaking News

हिमा दासची ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक ; तिसरी स्पर्धा जिंकून रचला इतिहास

झेक प्रजासत्ताक : वृत्तसंस्था

भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने 11 दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या क्लांदो स्मृती अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे.

वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती, परंतु तिने पुनरागन करीत 11 दिवसांत भारताला तीन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमाने 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. तिने 23.65 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तिने कुंटो अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 23.97 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली. आता हिमाने 23.43 सेकंदाच्या वेळेसह आणखी एक सुवर्णपदक नावावर केले आहे.  दरम्यान, क्लांदो स्पर्धेत भारताच्या विपिन कसाना (82.51 मीटर) , अभिषेक सिंग (77.32 मीटर) आणि दविंदर सिंग कांग (76.58 मीटर) यांनी पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अव्वल तिघांत स्थान पटकावले. पुरुषांच्याच गोळाफेक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमधारी तेजिंदरपाल सिंग थूर याने 20.36 मीटरसह कांस्यपदक जिंकले. महिलांच्या 400 मीटर शर्यतीत व्ही. के. विस्मयाने वैयक्तिक कामगिरी उंचावताना 52.54 सेकंदाची वेळ नोंदवून गटात अव्वल, तर सरिताबेन गायकवाडने 53.37 सेकंदासह तिसरे स्थान पटकाविले.

– शेतकर्‍याची पोर सरस

आसाममधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमानं गतवर्षी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. त्यानंतर तिच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळत आहे. 5 आणि 8 जुलै रोजी हिमा दासने 200 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने ‘सुवर्ण’ जिंकत इतिहास रचला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply