Breaking News

पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?

कटकारस्थानातून सत्तेवर आलेले तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार येत्या आठवड्याभरात कसेबसे एक वर्ष पूर्ण करेल. कोरोनाच्या सावटाखाली दिवाळी कशीबशी आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा लॉकडाऊनचे भूत भेडसावू लागले आहे. त्यातच भरमसाठ वीजबिलांनी महाराष्ट्रातील जनता अतिशय जिकिरीला आली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नी वेळेवर सुयोग्य निर्णय घेण्याऐवजी गोंधळच अधिक घालणारे हे सरकार कधी एकदाचे पायउतार होते याचीच प्रतीक्षा महाराष्ट्रातील मतदार करीत असतील असे वाटते.

महाराष्ट्रातील शाळा सोमवारपासून सुरू करण्यासंदर्भात घोषणाबाजी झाली होती. परंतु शाळांचा प्रश्न अजुनही प्रश्नांकितच आहे, असे सांगून खुद्द मुख्यमंत्र्यांनीच संभ्रमात भर टाकली आहे. वर्ष निम्मे अधिक निघून गेले तरी ना अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा विषय मार्गी लागला, ना मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला. कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोलावयाचे तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नागपूर शहरच गुन्हेगारीची राजधानी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. एकंदरीत सगळाच आनंदी आनंद आहे. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढू लागली. राजधानी दिल्लीप्रमाणेच मुंबईत देखील कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी भीती खुद्द ठाकरे सरकारलाच वाटते. आटोक्यात आलेली परिस्थिती लोकांनी निर्बंध न पाळल्यामुळे हाताबाहेर जाईल व कोरोनाची दुसरी लाट नव्हे तर त्सुनामी अवतरेल, अशी भीती मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारच्या भाषणात व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लाट पुन्हा आली तर त्याला राज्य सरकारमधील सावळागोंधळच जबाबदार असेल. यंदाच्या दिवाळीत जनतेने खूपच संयम बाळगला. फटाक्यांचे आवाज कमीत कमी झाले. बाजारपेठांमध्ये गर्दी सुद्धा काही मोजकेच दिवस झाली. तरीही लोकांवरच खापर फोडण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून होत आहे. याचा निषेध करावा तितका थोडाच. पुन्हा लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही, असे मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे त्यांचेच मंत्रिमंडळातील सहकारी तिसरेच बोलत असतात. दररोजची रुग्णसंख्या पाच हजाराच्या घरात येते आहे. त्यात आणखी वाढ झाल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असे काँगे्रसचे विजय वडेट्टीवार म्हणाले तर कठोर निर्बंध लादण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी येत्या आठ-दहा दिवसांत लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. एकूण पाहता सारी पावले पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनेच पडत असल्याची चिन्हे आहेत. मात्र महाराष्ट्राला हे मुळीच परवडणारे नाही. गेले सात-आठ महिने आर्थिकदृष्ट्या अतिशय वाईट गेले आहेत. राज्याची अर्थव्यवस्था साफ कोलमडलेली आहे. हजारो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत आणि अगणित व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. गोरगरिबांच्या खिशात पैसा नाही आणि सरकार मात्र एकीकडे कोरोना-कोरोना अशी ओरड करत अव्वाच्या सव्वा वीजबिले जनतेच्या माथी मारत आहे. अशा परिस्थितीत येत्या आठवड्याभरात वर्षवाढदिवस साजरा करणारे हे सरकार कधी एकदा जाईल याचीच वाट जनता पाहात असणार. येत्या दोन महिन्यांत ठाकरे सरकार पडेल आणि भाजपप्रणित स्थिर सरकार सत्तेवर येईल असा आशावाद भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तसेच या वेळी पहाटे नव्हे तर योग्य वेळी शपथ घेऊन येईन, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये सांगितले. या दोघांच्याही तोंडी साखर पडो असेच महाराष्ट्रातील जनता म्हणत असेल.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply