Tuesday , March 28 2023
Breaking News

पुढल्या वर्षी टेकऑफ

नवी मुंबई विमानतळ कामाला सिडकोकडून गती

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2020मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीबरोबरच विमानतळापर्यंत प्रवाशांना कमीत कमी वेळात पोहोचता यावे, यासाठी सिडकोने जलमार्गाच्या पर्यायावर भर दिला आहे. त्यानुसार नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जलद दळणवळणाची साधने आवश्यक असणार आहेत, त्यानुसार सिडको व राज्य शासन दळणवळणाच्या विविध पर्यायांवर विचार करत आहे. त्यामध्ये न्हावा-शेवा सी लिंक, कोस्टल रोड, सीएसएमटी-पनवेल रेल्वे उन्नत मार्ग आदीचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतून प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलदगतीने पोहोचता यावे, या दृष्टीने जलमार्गाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्यासोबत बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. बीपीटी, जेएनपीटी आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा सागरी मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून वाशी, बेलापूर आणि नेरूळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यासाठी दोन प्रवासी बोट व एक वॉटर टॅक्सी घेण्याची योजना आहे. त्या संदर्भात शिपिंग कॉर्पोरेशनशी चर्चा सुरू आहे. पावसाळ्यानंतर मुंबई ते नवी मुंबई दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे. सध्या हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, पावसाळ्यानंतर बहुप्रतीक्षित जलमार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याची सिडकोची योजना आहे.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply