Tuesday , March 28 2023
Breaking News

बिरवाडीतील चोर्यांमागे मध्य प्रदेशची टोळी ; पळून जाणार्या दोघांना खेडमध्ये पकडले, एक जण फरारी

महाड : प्रतिनिधी

महाडच्या बिरवाडी व काळीज परिसरात धुमाकूळ घालत साडेपाच लाखांचा ऐवज लुटून गेलेल्या चोरट्यांपैकी दोघांना खेड पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडले आहे. महाड पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून, परिसरात चोर्‍या करणारी ही टोळी मध्य प्रदेशातील असल्याचे उघड झाले आहे.

महाड शहर, बिरवाडी, तसेच औद्योगिक परिसरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने चोर्‍या, घरफोडी होत आहेत. बिरवाडीत शनिवारी (दि. 13) पहाटे चोरट्यांनी बाजारपेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफाचे दुकान फोडून या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला, तसेच श्री कॉलनी परिसरातील विठोबा सावंत यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चार हजारांचा ऐवज लंपास केला, पण सावंत कुटुंबीयांना जाग आल्याने त्यांनी व शेजारी असलेल्या बालाजी तनपुरे या नागरिकाने चोर चोर अशी आरडाओरड केला. या वेळी त्यांच्यावर चोरट्यांनी दगडांचा मारा केल्याने ते जखमी झाले. नागरिकांच्या भीतीने येथून पळालेल्या चोरट्यांनी काळीज गावामधील सीताराम मोरे कॉम्प्लेक्सला लक्ष्य केले. या इमारतीत बंद असलेल्या तीन फ्लॅट्समध्ये चोरी केली. यात सखाराम बाबू साळुंके यांच्या घरातील एक लाखाची रोख रक्कम व 15 तोळे सोन्याचे दागिने असा पाच लाख 41 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नागरिकांच्या भीतीने पोबारा केलेल्या चोरट्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला.

दरम्यान, या प्रकारानंतर चोरटे पळून गेल्याचे बिनतारी संदेश सर्वत्र पसरवण्यात आले होते. दोन मोटारसायकलींवरून सहा जण खेडच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कशेडी चौकीदरम्यान पोलिसांना पाहताच या चोरांनी दुचाकी रस्त्यात टाकून जंगलात पळ काढत कशेडीच्या पलीकडे महामार्गावर जाऊन रिक्षा पकडली. तेथून ते खेडला जात असताना पोलिसांनी त्यांना रिक्षातून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेथूनही नदीतून पळ काढत असताना दोघे पोलिसांच्या हातात सापडले, तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

दिनेश धनसिंग अलावा व जितेश भवसिंग मनलोई ही चोरट्यांची नावे असून, दोघेही मध्य प्रदेशातील आहेत. या दोघांसह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पळून गेलेल्यांचा शोध सुरू आहे.

– सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरटे कैद चोरीच्या एका गुन्ह्यात या चोरांचा समावेश सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी पळून जाताना वापरलेली दुचाकीही चोरीची असून, महाडमधील इतर गुन्ह्यांतदेखील या चोरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply