लंडन : वृत्तसंस्था
दोलायमान सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने दुसर्या मानांकित रॉजर फेडररला पराभूत करीत पाचव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकाविले. सुमारे चार तास 55 मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचने फेडररला 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 अशा सेटने पराभूत केले.
पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखली. फेडररलाच 2-1 या स्कोअरवर एक ब्रेकपॉइंट मिळाला. दुसर्या सेटमध्ये फेडररने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने जोकोविचच्या दोन्ही सर्व्हिस ब्रेक करीत 4-0 अशी आघाडी घेतली. तिसर्या सेटमध्ये जोकोविच टायब्रेकरवर अव्वल ठरला. चौथ्या सेटमध्ये पुन्हा फेडररने बाजी मारली.
पाचव्या व निर्णायक सेटमध्ये जोकोविचने फेडररची सर्व्हिस तोडत 4-2 अशी आघाडी घेतली, मात्र फेडररने ब्रेक पॉइंट घेत सामना 4-4 असा बरोबरीत आणला. या वेळी जोकोविचने शानदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. त्याने सामना 8-8 असा बरोबरीत आणला. नव्या नियमानुसार 12-12 असा टायब्रेकर झाला. यात बाजी मारत जोकोविचने आपले 16वे ग्रॅँड स्लॅम जिंकले.