कर्जत ः बातमीदार
सर्वसामान्य आणि गरीब लाभार्थी यांना शिधावाटप दुकानात नियमानुसार धान्य मिळावे, यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचवेळी गॅस जोडणीमधील त्रुटी दूर करून गॅस जोडणी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरूवात कर्जत तहसिल कार्यालयात करण्यात आली, त्यावेळी सबंधित यंत्रणांना तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी सूचना दिल्या. राज्य सरकारच्या महसूल विभागाने चूलमुक्त महाराष्ट्र आणि धूरमुक्त कुटुंब निर्माण करून निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात राज्यातील एकही रहिवासी असलेल्या पाञ लाभार्थ्याना शिधापत्रिका देणे, ज्यांना धान्य मिळत नाही अशा पाञ कुटुंबांना प्राधान्य गटाचा लाभ मिळवून देणे, नवीन गॅस कनेक्शन देणे ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पुढील महिनाभर हे अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली. 15 ऑगस्टपर्यंतच्या या कालावधीत तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागाच्या वतीने ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत गावो गावांमध्ये शिबिरे भरवून 100 टक्के पाञ लाभार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांना वेळेवर शिधावाटप दुकानात धान्य मिळण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा 2013नुसार ऱेशनकार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कर्जत तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीमध्ये ज्यांना अद्याप गॅस कनेक्शन मिळाले ऩाही, अशा पात्र कुटुंबांना गॅस जोडणी दिली जाणार आहे. चूलमुक्त आणि धूरमुक्त कुटुंब अशा स्वरूपाची ही मोहीम राबवून यशस्वी करण्यासाठी रेशन दुकानदार, सामाजिक संस्थाची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक गावात पुरवठा विभागाच्या वतीने 21 ते 28 जुलै दरम्यान रेशन कार्डासाठी लागणारी कागदपञे जमा केली जाणार आहेत.