फार्मा पार्क प्रकल्पग्रस्तांचा अलिबागेत संवाद मेळावा
अलिबाग : प्रतिनिधी
रोहा, मुरूड तालुक्यातील फार्मा पार्क प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असताना या प्रकल्पासाठी भूसंपादनाची घाई कशाला, असा सवाल केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेवून स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय होणार नाही याची निश्चितपणे काळजी घेवू, असे आश्वासन पाटील यांनी शेतकर्यांना दिले.
रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्यात फार्मा पार्क प्रकल्प राज्य सरकारने प्रस्तावीत केला आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान अलिबाग येथे या परिसरातील शेतकर्यांशी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना ना. कपिल म्हणाले की, शेतकर्यांचा फार्मा पार्कला विरोध नाही, पण यापूर्वी अन्य ठिकाणी संपादीत केलेल्या जागांचा पर्याय त्यांनी सूचवला आहे. ही खूपच सकारात्मक बाब आहे. आम्हाला विकास नक्की हवा आहे परंतु इथला आगरी, कोळी माणूस जगला पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यादृष्टीनेच आमची पुढची पावले असतील असे पाटील यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी संपादीत करायच्या आणि शेतकर्यांना भूमीहीन करायचे, त्यांची रोजीरोटी घालवायची हा या लोकांचा धंदा आहे. परंतु सरकारचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, या संदर्भात आम्ही सभागृहात आवाज उठवू, असे सांगतानाच ही गंभीर बाब केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी ना. कपिल पाटील यांना केले.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी शेतकर्यांची भूमिका विषद केली. काही राजकीय मंडळींनी या भागातील जमिनी कमी दरात विकत घेतल्या आहेत. त्यांना त्या विकून पैसा कमवायचा आहे. त्यासाठीच हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप अॅड. मोहिते यांनी केला. फार्मा पार्क प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन ना. पाटील यांना दिले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.