

पनवेल ः रामप्रहर वृत्त
चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे गुरुवारी (दि. 12) सायन्स ऑफ टॉक्सिकॉलॉजी व ओन्कलॉजी अवेयरनेस या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात डॉक्टर अश्विनी फडणीस-मोघे, कोवेंस लेबोरेटरीज, मॅडिसन, यु. एस. ए. यांनी विद्यार्थ्यांना टॉक्सिकॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन केले. कुठल्याही औषधाचा ओव्हर-डोस घेतल्यास तो विषारी ठरू शकतो असे मत डॉक्टर अश्विनी यांनी मांडले. टॉक्सिकॉलॉजी हे एक उदयन्मुख क्षेत्र असून या क्षेत्रात सूक्ष्म जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांना भारतात व भारताबाहेर अनेक संधी उपलब्ध आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, जसे की एफएमसीजी, कॉस्मेटिक्स, फार्मास्युटिकल्स, पॅकेज फुड्स, कम्प्युटर अँड मोबाईल हार्डवेअर यांना टॉक्सिकॉलॉजीस्टची आवश्यकता असते. या विषयाशी निगडित विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन डॉ अश्विनी फडणीस-मोघे यांनी केले. चर्चासत्राच्या दुसर्या भागात एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कन्सल्टंट ऑन्कॉलॉजी सर्जन डॉक्टर प्रिया इशपूनियानी यांनी विद्यार्थ्यांना कर्करोगाची जाणीव असणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती दिली. या चर्चासत्रात डॉक्टर प्रिया यांनी कर्करोगाचे अनेक कारणे, त्यांची लक्षणे, त्यांचे निदान व परिणाम यासंदर्भात परिपूर्ण माहिती दिली. आजच्या या युगात आपण सर्वजण कर्करोगाला संवेदनाक्षम आहोत. आपल्या खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, व्यायाम न करणे, धूम्रपान व मद्यपानाच्या आहारी जाणे, मुबलक पाणी न पिणे अशा अनेक गोष्टी आपल्याला कर्करोगाला संवेदनाक्षम बनवतात. अशी माहिती डॉक्टर प्रिया यांनी दिली. विद्यार्थ्यांचे शंका निरसन करताना डॉक्टर प्रिया यांनी सांगितले की मोबाईलच्या रेडिएशन मुळे कॅन्सर होत नाही परंतु त्यामुळे डोळ्यांचे आजार व मेंदूचे आजार होऊ शकतात. चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वसंत बर्हाटे यांनी शुभेच्छा दिल्या. या चर्चासत्रात 130 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व यशस्वी आयोजनासाठी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.