माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा गौप्यस्फोट, श्रीवर्धन येथे महायुतीची जाहीर सभा
श्रीवर्धन : प्रतिनिधी
सुनील तटकरे सुरुवातीला पक्षप्रवेशासाठी भाजप श्रेष्ठींकडे गेले होते, परंतु त्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक असलेला आम्हाला नको, असे सांगितले. मग मातोश्रीवर गेले आणि म्हणाले की, आम्हाला शिवसेनेत प्रवेश आणि आदितीला श्रीवर्धनमधून उमेदवारी द्या. त्या ठिकाणी मी त्यांना विरोध केला, असा गौप्यस्फ ोट माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी (दि. 11) रानवली (ता. श्रीवर्धन) येथे जाहीर सभेत केला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी रानवली येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात अनंत गीते बोलत होते. काँग्रेस आता संपुष्टात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस संपण्याच्या मार्गावर आहे. याउलट महायुतीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. लोकसभा निवडणुकीत सदाचार विरुद्ध भ्रष्टाचाराची लढाई होती. त्या वेळी आपल्याकडून चुकून पापाचा विजय झाला, मात्र ती चूक या वेळी आपल्याला सुधारायची आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा आपल्याला या वेळी काढायचा आहे आणि पापाला गाडायचे आहे, असे सांगून अनंत गीते यांनी आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन केले. राज्यात 15 वर्षे सत्तेत असताना विरोधकांनी विकासकामे केली नाहीत. आम्ही पाच वर्षांत विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये आणली. राज्यात सर्वच ठिकाणी विकासकामे केली आहेत. विनोद घोसाळकर यांना निवडून दिल्यानंतर श्रीवर्धनमध्ये विकासकामे करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार प्रवीण दरेकर यांनी या वेळी दिली. या मतदारसंघातील कुचकामी घराणेशाही संपविण्यासाठी आपल्याला बहुमताने विजयी करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी या वेळी केले. माजी आमदार तुकाराम सुर्वे, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक, शिवसेना नेते प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, आप्पा विचारे, बाळ लोखंडे, प्रतोष कोळथरकर, राजूशेठ चव्हाण, सायली तोंडलेकर, सुरेश करण, दादा मांडवकर, प्रशांत शिंदे, सुकुमार तोंडलेकर यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘तटकरेंची भ्रष्ट घराणेशाही संपवा‘
म्हसळा : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकरांना निवडून द्या आणि तटकरेंची भ्रष्ट घराणेशाही संपवा, असे आवाहन माजी मंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी म्हसळा येथे केले. महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ म्हसळा शहरातील धावीर मंदिराच्या पटांगणात आयोजित केलेल्या जाहीर सभेत अनंत गीते बोलत होते. राज्यात महायुतीचे किमान 220 आमदार निवडून येणार असून, सभागृहात विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसे संख्याबळही विरोधकांकडे नसणार, असे गीतेंनी सांगितले. विरोधकांच्या भूलथापांना जनतेने आता बळी पडू नये. श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीला हद्दपार करा, असे आवाहन करीत आमदार प्रवीण दरेकर यांनी तटकरे यांच्या घराणेशाहीवर टीका केली, तर माजी आमदार तुकाराम सुर्वे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी तटकरे यांच्या सिंचन घोटाळा आणि भ्रष्टाचारावर सडकून टीका केली. या वेळी शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर, माजी आमदार तुकाराम सुर्वे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, म्हसळा तालुकाप्रमुख महादेव पाटील, भाजप तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, सुजित तांदळेकर, नंदू शिर्के, अनिकेत पानसरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते.