Thursday , March 23 2023
Breaking News

तपपूर्तीकडे वाटचाल

एकीकडे वृत्तपत्र आणि टीव्ही या दोन माध्यमांमधील स्पर्धा वाढत असतानाच माहितीयुग अवतरले आणि इंटरनेटचे जाळे झपाट्याने अवघे जगणे व्यापू लागले. आता वृत्तपत्रे आणि टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांचीही वृत्तविषयक वेबसाईट ही नवी शाखा सामोरी येऊ लागली. एकीकडे झपाट्याने होत चाललेल्या माध्यमांच्या आधुनिकीकरणाच्या या काळात विधायकतेच्या जागराची गरज म्हणून ‘रामप्रहर’ या दैनिकाचा जन्म झाला.

देशी वृत्तपत्रांचा प्रारंभीचा काळ पाहिला, तर वृत्तपत्र व्यवसायाचे स्वरूप हे त्या काळी ठळकपणे ध्येयवादी होते हे स्पष्ट दिसते. इंग्रजीतील विद्येचा प्रसार आणि येथील जनतेचे ऐहिक कल्याण साधण्याच्या हेतूने बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या काळातील इतरही वृत्तपत्रांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्रातील प्रबोधनाला उत्तम चालना मिळाली. पुढे लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मार्फत सामाजिक प्रबोधनाबरोबरच राजकीय विचार जागृतीही आरंभली. त्यानंतर अनेक मराठी, इंग्रजी व अन्य भाषिक वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीत बहुमूल्य योगदान दिले. ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्याचा ध्यास या वृत्तपत्रांच्या केंद्रस्थानी होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हीच वृत्तपत्रे राष्ट्रउभारणीच्या कामी प्रयत्नशील झाली. पुढे काळाच्या ओघात देशातील अवघा सामाजिक, राजकीय, आर्थिक पट बदलत गेला. आर्थिक उदारीकरणानंतर तर वृत्तपत्र व्यवसायाचे अवघे स्वरूपच पालटले. प्रसारमाध्यमांमधली आघाडीची जागा टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांनी पटकावली. त्यांच्या दृश्यात्मकतेमुळे अर्थातच त्यांना मोठे वलय प्राप्त झाले. आता वृत्तपत्रांचे कसे होणार असा प्रश्न निर्माण होत असतानाच, वृत्तपत्रांनी आपले विश्वसनीय व प्रगल्भ पत्रकारितेतील स्थान बळकट असल्याचे सिद्ध केले. रायगड जिल्ह्याच्या व विशेषत: पनवेलच्या विकासाकरिता झटणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वैयक्तिक जनसंपर्क दांडगा होताच, पण समाजमनाशी जोडून घेण्याचे आणखी एक माध्यम म्हणून त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून दैनिक रामप्रहर साकारले. अवघी वृत्तपत्रसृष्टी आव्हानात्मक संक्रमणावस्थेतून जात असताना ‘रामप्रहर’ने आपला विधायकतेचा जागर गेली 11 वर्षे अखंड सुरू ठेवला आहे. ‘सब का साथ, सब का विकास और सब का विश्वास’ असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आपल्या व्यापक सामाजिक कार्याच्या भरभक्कम पायावर राजकीय जीवनात वाटचाल करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कायमच या तत्त्वांना जपले आहे. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रामप्रहर’ची वाटचालही उच्च मूल्यांनिशी सुरू राहिली. पनवेलवासीयांचा अखंडितपणे मिळालेला उदंड पाठिंबा ही खरे तर त्यांच्याच प्रामाणिक सामाजिक कार्याची पुण्याई. शिक्षण क्षेत्र असो वा पनवेलचा बहुअंगी विकास, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यशैलीची धुरा आता त्यांचे सुपुत्र सिडकोचे अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर, तसेच पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर तितक्याच समर्थपणे सांभाळत आहेत. पनवेलच्या विकासाने आता कमालीचा वेग घेतला आहे आणि नजीकच्या भविष्यकाळात पनवेलचा कायापालट सुनिश्चित आहे. या बदलांची मुहूर्तमेढ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रयत्नांतून रोवली गेली होती, हे समस्त पनवेलकर जाणतात व त्यामुळेच त्यांच्या कामाला दाद म्हणूनच वाचकांचे प्रेम ‘रामप्रहर’च्याही पारड्यात अखंड पडत राहिले आहे. 11 वर्षे पूर्ण करणार्‍या ‘रामप्रहर’ची आता तपपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. यापुढील वाटचालीतही आमचे वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांचा आमच्यावरील लोभ आणि प्रेम असेच चिरंतन कायम राहील हीच सदिच्छा.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply